मित्रांनो, हा माझा शेवटचा व्हिडिओ व्हायरल करा..! हिंजवडीत इमारतीवरून तरुणाची उडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 13:32 IST2025-04-06T13:31:38+5:302025-04-06T13:32:16+5:30
माझ्याकडे किती पैसे आहेत, किती उरले, हे विचारायचा काय हक्क आहे कोणाला? इन्स्टाग्रामवर केला व्हिडीओ अपलोड

मित्रांनो, हा माझा शेवटचा व्हिडिओ व्हायरल करा..! हिंजवडीत इमारतीवरून तरुणाची उडी
पिंपरी : 'मित्रांनो, हा माझ्या आत्महत्येचा व्हिडीओ आहे. व्हायरल करा', अशा मेसेजसह व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड करून तरुणाने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या त्याच्या दोघा मावसभावांना पोलिसांनी अटक केली. हिंजवडी फेज- २ येथे १२ फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास घडलेली ही घटना दोन महिन्यांनंतर पोलिस तपासात उघडकीस आली.
तेजस बाजीराव सोनागरे (२०, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिस उपनिरीक्षक किशन हरिभाऊ कांदे यांनी शुक्रवारी (दि. ४ एप्रिल) फिर्याद दिली. नीलेश ऊर्फ गोलू संजय पुंडे (२५) आणि मंगेश संजय पुंडे (२३, दोघेही रा. तळवडे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तेजस हिंजवडीतील खासगी कंपनीत नोकरीस होता.संशयितांनी दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून तेजसने सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्याने इन्स्टाग्रामवर अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये आत्महत्येस नीलेश पुंडे आणि मंगेश पुंडे जबाबदार असल्याचे म्हटले होते. पोलिसांनी त्यांना अटक केली. तेजसच्या आई-वडिलांचे निधन झाले असून, मामानेच त्याचा सांभाळ केला आहे. तेजस एकलकोंडा होता.
काय आहे व्हिडीओत ?
तेजसने आत्महत्या करण्यापूर्वी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ अपलोड केला. 'हा व्हिडीओ पाहणाऱ्यांनो, तो जेवढा व्हायरल होईल, तेवढा व्हायरल करा. धिस इज माय सुसाइड व्हिडीओ. याचे एकमेव कारण म्हणजे घरी मला मेन्टली खूप त्रास दिला जातोय. मी कामाला येतोय, मी माझी सॅलरी कमावतोय, ऑब्व्हीअसली मी जे सेव्हिंग करतोय, ते माझ्या स्वतःसाठी करतोय. माझ्याकडे किती पैसे आहेत, किती उरले, हे विचारायचा काय हक्क आहे कोणाला? याला सगळ्यात मुख्य कारणीभूत आहेत, ते माझे दोन मावसभाऊ नीलेश पुंडे आणि मंगेश पुंडे. व्हिडीओ जेवढा व्हायरल करता येईल तेवढा प्लीज करा', असा व्हिडीओ तेजस यांनी इन्स्टाग्रामवर अपलोड केला.