पुणे-लोणावळा मार्गावर दुपारी लोकल नसल्याने गैरसोय; विशेषतः महिला आणि विद्यार्थ्यांचे हाल

By विश्वास मोरे | Published: October 15, 2023 04:33 PM2023-10-15T16:33:12+5:302023-10-15T16:33:28+5:30

गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे विभागाने मधल्या काळात लोकल सुरु करावी, अशा सूचना

Pune-Lonavala route is inconvenient as there is no local in the afternoon; Especially the plight of women and students | पुणे-लोणावळा मार्गावर दुपारी लोकल नसल्याने गैरसोय; विशेषतः महिला आणि विद्यार्थ्यांचे हाल

पुणे-लोणावळा मार्गावर दुपारी लोकल नसल्याने गैरसोय; विशेषतः महिला आणि विद्यार्थ्यांचे हाल

पिंपरी: पुणे-लोणावळा मार्गावरील लोकल दुपारी नसल्याने चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. सकाळी दहा ते दुपारी पावणे तीन या कालावधीत एकही लोकल नसते. त्यामुळे प्रवासी विशेषतः महिला आणि विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. ही गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे विभागाने मधल्या काळात लोकल सुरु करावी, अशा सूचना दिल्या आहेत.  

मध्य रेल्वेच्यापुणे आणि सोलापुर विभागाची बैठक झाली. या बैठकीसाठी खासदार श्रीरंग बारणे, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजीतसिंग निंबाळकर, खासदार जयसिद्धेश्वर महाराज, खासदार धैर्यशील माने, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार वंदना चव्हाण, महाव्यवस्थापक नरेश लालवानी, पुणे विभागाच्या व्यवस्थापक इंदुराणी दुबे, उप महाव्यवस्थापक अजय मिश्रा, वरिष्ठ मुख्य परिवहन व्यवस्थापक श्याम सुंदर गुप्ता, वरिष्ठ मुख्य सुरक्षा आयुक्त अजोया सदानी, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानासपुरे आदी उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा कार्यक्षेत्रात येणाऱ्या दापोडी ते लोणावळा दरम्यानच्या रेल्वे स्थानकांवर सुरु असलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. सुरु असलेली सर्व कामे वेळेत पूर्ण करून प्रवाशांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याच्या सूचना दिल्या. सकाळी दहा वाजता लोणावळा स्थानकावरून लोकल आहे. त्यानंतर सुमारे पावणे पाच तास एकही लोकल नाही. दुपारी अडीच वाजता नंतरची लोकल सुटते. वडगाव, कान्हे, कामशेत, मळवली या परिसरातून लोणावळा येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. अनेक नागरिक वेगवेगळ्या कामांसाठी लोणावळा शहरात जात असतात.

तब्बल पावणे पाच तास लोकल नसल्याने या सर्वांची गैरसोय होते. शाळा-महाविद्यालय सुटल्यानंतर विद्यार्थी रेल्वे स्थानकावर बसतात. इथे अपघात तसेच अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते. त्यात बराच वेळ रेल्वे स्थानकावर गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे मधल्या कालावधीत लोकल सुरु करणे अत्यंत आवश्यक असल्याचे निरीक्षण खासदार श्रीरंग बारणे यांनी मांडले. मधल्या काळात मेंटेनन्सची कामे केली जात असल्याचे रेल्वेकडून सांगितले जाते. मात्र ही कामे इतर वेळेत पूर्ण करण्यात यावीत. कान्हे फाटा येथे रेल्वे उड्डाणपूल उभारण्याच्या कामासाठी मंजुरी मिळाली आहे. मात्र तिथे जमीन संपादित करण्यासाठी काही अडचणी येत आहेत. त्यामुळे रेल्वे विभाग आणि राज्य शासन यांची संयुक्त बैठक घेऊन त्यावर मार्ग काढावा. तसेच वडगाव येथील भूमिगत मार्गाचे काम लवकरात लवकर सुरु करावे, अशा सूचना  बारणे यांनी रेल्वे विभागाला दिल्या आहेत.

तळेगाव स्थानकावर रेल्वे गाड्यांना थांबा द्या

सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा सुरु करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. ही गाडी सुरु झाल्यानंतर तिला तळेगाव स्थानकावर थांबा देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. सिंहगड एक्सप्रेसला तळेगाव येथे थांबा देण्यासाठी तांत्रिक बाबींची पडताळणी सुरु आहे. पुणे-भुसावळ-पुणे ही गाडी ब्लॉकच्या कारणास्तव बंद केली आहे. ही गाडी सुरु झाल्यानंतर तिला देखील तळेगाव येथे थांबा दिला जाणार आहे.

रेल्वे स्थानकांवरील कामे प्रगतीपथावर

तळेगाव, आकुर्डी, देहूरोड, चिंचवड अशा विविध रेल्वे स्थानकांचा अमृत स्टेशन योजनेत सहभाग झाला आहे. त्याअंतर्गत या रेल्वे स्थानकांवर मागील काही कालावधीपासून नवीन पादचारी मार्ग, फलाटांची लांबी, फलाटावरील विविध सुविधा, फलाटांची उंची अशी विविध कामे केली जात आहेत. दापोडी ते लोणावळा दरम्यानच्या सर्व स्थानकांच्या सुशोभीकरणाचे काम केले जात आहे. चिंचवड, आकुर्डी, दापोडी, देहूरोड, घोरावाडी, कामशेत, कासारवाडी, मळवली, तळेगाव, वडगाव स्थानकांवर दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष सुविधा केली आहे. चिंचवड येथे कव्हर ओव्हर शेड, सीओपी, स्टेशन सर्क्युलेटिंग एरियाची कामे प्रगतीपथावर आहेत. आकुर्डी येथे नवीन लिफ्ट उभारण्यात आली आहे. लोणावळा स्थानकाचे मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण केले जाणार आहे.

Web Title: Pune-Lonavala route is inconvenient as there is no local in the afternoon; Especially the plight of women and students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.