ओव्हरहेड वायर तुटल्याने पुणे लोणावळा वाहतूक विस्कळीत
By अविनाश रावसाहेब ढगे | Published: March 18, 2024 08:17 PM2024-03-18T20:17:10+5:302024-03-18T20:17:26+5:30
लोणावळ्यावरुन पुण्याच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक सुमारे दीड तास ठप्प होती.
पिंपरी : मध्य रेल्वेच्या पुणे-लोणावळा मार्गावर सोमवारी सांयकाळी चारच्या सुमारास मळवली स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. या मार्गावर धावणाऱ्या काही लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. तर अनेक एक्स्प्रेस गाड्या दीड ते दोन तास उशीराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
पुणे -लोणावळा रेल्वे मार्ग अतिशय व्यस्त मार्ग आहे. दररोज १५० हून अधिक एक्स्प्रेस रेल्वे या मार्गावरुन ये-जा करतात. तर पुणे-लोणावळा, तळेगाव दरम्यान लोकलच्या ४२ फेऱ्या होतात. पुणे लोणावळा मार्गावर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. पुणे-लोणावळा मार्गावर सोमवारी सांयकाळी चारच्या सुमारास मळवली स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती.
लोणावळ्यावरुन पुण्याच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक सुमारे दीड तास ठप्प होती. मुंबईवरुन पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कोनार्क, चेन्नई एक्स्प्रेस घाटात थांबविण्यात आल्या होत्या. तर नांदेड पनवेल, वंदे भारत, प्रगती एक्स्प्रेस आणि डेक्कनक्वीन एक्स्प्रेस या कर्जत स्थानकामागे थांबविण्यात आल्या होत्या. या एक्स्प्रेस रेल्वे साधारण दीड ते दोन तास उशीराने धावत होत्या. तर या मार्गावर धावणाऱ्या काही लोकल रद्द तर काही लोकल उशीरा सोडण्यात आल्या होत्या. ट्रेन उशीराने धावत असल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत होता. सायंकाळी सहाच्या सुमारास ओव्हहेड वायर दुरुस्त झाल्यानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत झाली.