रेल्वेची लोणावळा-पुणे तिसरी आणि चौथी मार्गिका करा; खासदार श्रीरंग बारणेंची लोकसभेत मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 15:21 IST2025-03-19T15:14:02+5:302025-03-19T15:21:04+5:30
दुपारी दीड वाजता लोणावळ्यावरून पुण्याला जाणारी लोकल पुन्हा सुरू करावी, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली.

रेल्वेची लोणावळा-पुणे तिसरी आणि चौथी मार्गिका करा; खासदार श्रीरंग बारणेंची लोकसभेत मागणी
पिंपरी :पुणे ते लोणावळादरम्यानची रेल्वेची तिसरी आणि चौथी मार्गिका जमीन अधिग्रहण न झाल्याने रखडली आहे. पनवेलमध्ये देशातील सर्वांत मोठा विमानतळ होत आहे. त्यामुळे कर्जत ते लोणावळा आणि लोणावळा ते पुण्यापर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम करावे. त्यामुळे पनवेलपासून थेट पुण्यापर्यंत जलद रेल्वे धावू शकतात. दुपारी दीड वाजता लोणावळ्यावरून पुण्याला जाणारी लोकल पुन्हा सुरू करावी, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली.
केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावरील चर्चेत खासदार बारणे यांनी सहभाग घेतला. शिवसेनेच्या वतीने अर्थसंकल्पावर चर्चा केली. खासदार बारणे म्हणाले की, अर्थसंकल्पात रेल्वेच्या विकासासाठी महत्वपूर्ण पावले उचलली आहेत. रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी अर्थसंकल्पात २.५२ लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. तीन वर्षात १०० अमृत भारत ट्रेन, ५० नमो भारत ट्रेन आणि २०० वंदे भारत ट्रेन तयार करण्यात येणार आहेत. महाराष्ट्राला सर्वाधिक २३ हजार ७७८ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यामुळे राज्यातील रेल्वेला गती मिळेल.
दुपारी दीडची लोकल पुन्हा सुरू करा
मावळ लोकसभा मतदारसंघात २०१७मध्ये तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेची घोषणा केली होती. केंद्र सरकारने मंजुरी दिली. अर्थसंकल्पात त्याचा उल्लेखही केला होता. परंतु, जमीन अधिग्रहण व अन्य कारणांमुळे तिसरा आणि चौथा मार्ग अद्याप रखडला आहे. पुणे ते लोणावळादरम्यान लोकल ट्रेन धावते. कोरोना काळात दुपारच्या वेळेत रेल्वे बंद केली होती. याबाबत अनेकदा पाठपुरावा करून बारा वाजता ट्रेन चालू केली. परंतु, दुपारी दीड वाजताची लोकल ट्रेन बंद असल्याने कामगार, महिला, विद्यार्थी यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे, असेही खासदार बारणे म्हणाले.