हिंजवडीत उद्योगांसह ६६ हजारांवर ग्राहकांची वीज पाऊण तास खंडित
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 10:10 IST2025-03-29T10:08:40+5:302025-03-29T10:10:13+5:30
आगीमुळे २२० केव्ही टॉवर लाइनला ट्रिपिंग

हिंजवडीत उद्योगांसह ६६ हजारांवर ग्राहकांची वीज पाऊण तास खंडित
पिंपरी : मुळशीतील माण गावातील शेतामधील गवताच्या आगीमुळे शुक्रवारी (दि. २८) सायंकाळी साडेपाचला महापारेषणच्या पिरंगुट-हिंजवडी २२० केव्ही अतिउच्चदाब टॉवर लाइनमध्ये ट्रिपिंग आले. त्यामुळे हिंजवडीतील २०० आयटी उद्योगांसह हिंजवडी, वाकड, माण, मारुंजी, कासारसाई, नेरे दत्तवाडी व परिसरातील घरगुती, व्यावसायिक व इतर सुमारे ६६ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा ४६ मिनिटे बंद होता.
दरम्यान, याच २२० केव्ही अतिउच्चदाब टॉवर लाइनमध्ये रात्री सातच्या सुमारास पुन्हा ट्रिपिंग आल्याने या सर्व परिसरात वीजपुरवठा बंद झाला. माणमधील येथे एका शेतावरून गेलेल्या महापारेषणच्या २२० केव्ही अतिउच्चदाब टॉवर लाइनखाली गवत पेटवल्यामुळे या लाइनमध्ये सायंकाळी साडेपाचला ट्रिपिंग झाले. परिणामी, महावितरणच्या पिंपरी व मुळशी विभागातील वीज यंत्रणेत १५२ मेगावॉटची तूट निर्माण झाली.
यामुळे हिंजवडी फेज १ ते ३ मधील २०० आयटी उद्योग, तसेच वाकड परिसर, माण, मारुंजी, कासारसाई, नेरे दत्तवाडी व परिसरातील घरगुती, व्यावसायिक व इतर सुमारे ६६ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सायंकाळी सव्वासहापर्यंत बंद होता. महापारेषणच्या वरिष्ठ अभियंत्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन दुरुस्तीचे काम पूर्ण केले. मात्र, रात्री सातच्या सुमारास पुन्हा या टॉवर लाइनमध्ये ट्रिपिंग आल्याने वीजपुरवठा पुन्हा खंडित झाला होता.