पुण्याप्रमाणेच आता पिंपरीत पार्किंग धोरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 03:40 AM2018-03-22T03:40:20+5:302018-03-22T03:40:20+5:30
पुणे महापालिकेप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरातही र्पाकिंगबाबतचे धोरण तयार केले आहे. हे धोरण लवकरच महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर आणण्यात येणार आहे. त्यातून शहरातील वाहतूककोंडी आणि र्पाकिंगचा प्रश्न सुटणार आहे.
पिंपरी : पुणे महापालिकेप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरातही र्पाकिंगबाबतचे धोरण तयार केले आहे. हे धोरण लवकरच महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर आणण्यात येणार आहे. त्यातून शहरातील वाहतूककोंडी आणि र्पाकिंगचा प्रश्न सुटणार आहे. नागरीकरण वाढल्याने र्पाकिंग प्रश्न जटिल झाला आहे. प्रशासनाने र्पाकिंग धोरण तातडीने सर्वसाधारण सभेपुढे आणावे, अशी सूचना महापौर नितीन काळजे यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहराचे नागरीकरण वाढले आहे. त्यामुळे वाहनांची संख्या वाढली आहे. शहरातील प्रमुख मार्ग, तसेच उपनगरातही र्पाकिंगचा मोठा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे महापालिका, वाहतूक पोलीस, प्रशासन करीत असलेल्या दुर्लक्षामुळे शहरातील विविध भागात पार्किंगची समस्या वाढतच आहे. यावर पर्याय म्हणून आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी र्पाकिंग धोरण राबविण्यात येणार आहे, असे काही महिन्यांपूर्वी सांगितले होते. याबाबतचे वृत्त लोकमतने सर्वप्रथम प्रकाशित केले होते. धोरण तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे धोरण लवकर सभागृहासमोर आणावे, अशी सूचना महापौरांनी केली.
वाढत्या नागरीकरणाप्रमाणेच वाहनांची संख्या वाढल्याने शहरात र्पाकिंगची मोठी समस्या आहे. शहरातून जाणारा पुणे-मुंबई महामार्ग असेल किंवा गावठाणाच्या परिसरातील र्पाकिंगचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. र्पाकिंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पालिकेने र्पाकिंगचे धोरण तयार केले आहे. हे धोरण महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर धोरणाची अंमलबजावणी केली जाईल.
- श्रावण हर्डीकर, आयुक्त