पुणे - मुंबई महामार्गावर रस्ता ओलांडताना डंपरखाली सापडून एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 05:31 PM2021-08-17T17:31:09+5:302021-08-17T17:31:20+5:30
महामार्गावर तळेगाव खिंडीतील विजय मारुती मंदिराजवळ मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
तळेगाव दाभाडे : पुणे - मुंबई महामार्गावर रस्ता ओलांडताना डंपरखाली सापडून एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात जुन्या महामार्गावर तळेगाव खिंडीतील विजय मारुती मंदिराजवळ मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास झाला. सिद्धार्थ इरन्ना मुच्छंडी (वय ४५, रा. नीळकंठनगर, तळेगाव दाभाडे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. तो रंगकाम करणारा कुशल कारागीर होता.
या अपघातात डंपरचालक किरकोळ जखमी झाला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या विचित्र झालेल्या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
पोलीस उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव बाजूकडून पुण्याच्या दिशेने जाणारा डंपर नॅशनल हेवी कंपनीसमोरील छेद रस्त्याजवळ आला असता पादचाऱ्यास वाचविण्याच्या नादात तो पलटी झाला. यामध्ये रस्ता ओलांडणारे सिद्धार्थ मुच्छंडी हे डंपरखाली सापडून गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा छेद रस्ता बॅरिगेट्स टाकून वाहने आणि प्रवाशांसाठी बंद करण्यात आलेला आहे. तरीही प्रवाशी दोन बॅरिगेट्समधील जागेतून रस्ता ओलांडतात.
छेद रस्त्यावरून अचानक वाहने व पादचारी रस्त्यावर येत असल्याने वाहन चालक जोरात ब्रेक मारतात. त्यामुळे या ठिकाणी लहान मोठे अपघात होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. सदरचा छेद रस्ता कायमचा बंद करावा अशी सजग नागरिकांची मागणी आहे. तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी जयेश बिरारी यांनी शव विच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांच्या मार्गर्शनाखाली अनिकेत हिवरकर करीत आहेत.