अहो ऐकलं का? पुण्यात पेट्रोल ९५ रुपये लिटर झालंय..., इंधन दरवाढीनं पुणेकरही त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 06:07 PM2021-02-15T18:07:34+5:302021-02-15T18:08:11+5:30
पेट्रोलने गाठला ९५ रुपये मैलाचा दगड, सलग सातव्या दिवशी भाववाढ
पिंपरी : इंधनाचे दर वेगाने शंभरीच्या दिशेने चालले आहेत. सोमवारी (दि. १५) पेट्रोलच्या भावाने प्रतिलिटर ९५ रुपयांचा टप्पा पार केला. तर, डिझेलचे भाव ८५ रुपयांच्या घरात पोहोचले. शहरात सलग सातव्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ नोंदविण्यात आली. पेट्रोल आणि डिझेलचे भाव दररोज आपला पूर्वीचा उच्चांक मोडत आहेत. शहरात २० नोव्हेंबर-२०२० पासून इंधनाच्या भावाचा घोडा उधळू लागला आहे. त्याला अद्यापही लगाम बसला नाही.
इंधनच्या दरात दररोज काही पैशांची वाढ होत आहे. पेट्रोलचा ९ फेब्रुवारीचा भाव ९३.४८ आणि डिझेलचा ८२.७४ रुपये प्रतिलिटर होता. या सात दिवसांत पेट्रोल १.६२ आणि डिझेल १.९४ रुपयांनी महागले. आंतरराष्ट्रीय बाजारात २०१३ साली क्रूड ऑईलची किंमत १४० डॉलरच्या घरात गेली होती. त्यावेळी पेट्रोलचा भाव उच्चांकी ९३ रुपयांवर गेला होता. तर, डिझेलचा या पूर्वीचा उच्चांक ७८ रुपये प्रतिलिटर होता. या उच्चांकी भावाचे आकडे केव्हाच मागे पडले आहेत.
तीन महिन्यात पेट्रोल साडेआठ, डिझेल नऊ रुपयांनी महागले
गेल्या तीन महिन्यांमध्ये पेट्रोलच्या भावात प्रतिलिटरमागे ७.४३ आणि डिझेलच्या भावात ८.९७ रुपयांनी वाढ झाली. शहरात २० नोव्हेंबर २०२० रोजी पेट्रोलचा प्रतिलिटर भाव ८७.६७ रुपये होता. तर, डिझेलचा भाव ७५.७१ रुपये प्रतिलिटर होता. सोमवारी (दि. १५) पेट्रोलच्या भावाने ९५.१० आणि डिझेलने ८४.६८ रुपयांवर झेप घेतली.
प्रकार २० नोव्हेंबर-२०२० ते १९ डिसेंबर २० १९ जानेवारी-२०२१ १५ फेब्रुवारी-२१
पेट्रोल ८७.६७ ९० ९१.४७ ९५.१०
डिझेल ७५.७१ ७८.९७ ८०.५८ ८४.६८