पुण्यात सुप्रसिद्ध अभिनेत्री मधू कांबीकर यांना घरी जाऊन दिली कोरोना प्रतिबंधक लस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 01:00 PM2021-08-23T13:00:20+5:302021-08-23T13:00:59+5:30
पिंपरी - चिंचवडच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने घेतला पुढाकार
पुणे : मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या चार दशकापासून अविरत कलेची सेवा करणाऱ्या सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांना घरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. २०१६ मध्ये एका लावणीच्या कार्यक्रमादरम्यान त्यांना पक्षाघाताचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार केले. परंतु मागील ४ वर्षांपासून त्या अंथरुणात खिळून असून घरीच उपचार चालू आहेत, सध्या त्यांचे वास्तव्य पुण्यातील येरवडा येथील घरी आहेत.
कुटुंबियांनी पुणे महानगरपालिकेला, घरी येउन त्यांना लस देण्याची विनंती केली परंतु त्यांच्या असहाय स्थितिमधल्या हाकेतील आर्तता पुणे महानगरपालिकेला आजपर्यंत कळली नाही हे विशेष. महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडच्या बैठकीत ही गंभीर बाब त्यांचे स्नेही लहू पाटील यांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार अविनाश कांबीकर यांनी मसाप चे अध्यक्ष राजन लाखे यांच्या निदर्शनास आणून दिली. लाखे यांनी त्वरीत कांबीकर यांना सोबत घेउन डॉ डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे कुलपती डॉ. पी. डी पाटील यांची भेट घेतली. आणि अभिनेत्री मधु कांबीकर यांची सद्य परिस्थिती तसेच असहाय स्थिती सांगून त्यांच्याघरी लस देण्यास विनंती केली. डॉ. पी. डी. पाटील यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांच्या हॉस्पिटल मधील डॉक्टरांना बोलावून तशा सुचना दिल्या व त्वरीत कार्यवाही करण्यास बजावले. आणि दुसऱ्याच दिवशी डॉ. पाटील यांच्या सुचनेनुसार मधु कांबीकर यांच्या येरवडा येथील घरी जाऊन त्यांना लस देण्यात आली.
मधू यांनी अभिनयानं फुलवली चित्रपटसृष्टी
कलेचा त्यांचा प्रवास हा लावणी, लोकनाट्य, चित्रपट, नाटक, दूरदर्शन मालिका पुन्हा लोकरंगमंच अशा विविध अंगानं बहरलेला राहिला. नागर रंगभूमी व ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या या अभिनेत्रींचे स्थान निश्चित वाखाणण्यायोग्य आहे. माना – सन्मानाचे पुरस्कार व प्रसिद्धी मिळूनही त्यांनी सखी माझी लावणी या कार्यक्रमाचे ‘ प्रयोग अमेरिका, अबुधाबी, दुबई, मॉरिशियस अशा देशात करून मराठी मनाच्या लावणीस बहुमान प्राप्त करून दिला. शब्दप्रधान लावणीनृत्य सादर करून शब्दांना अर्थवाही केले. पूरक मुद्राभिनय आणि आंगिक अभिनयानं फुलवण्याचे कसब मधू कांबीकरानी करून दाखवले.