पुणे संघाला विजेतेपद
By Admin | Published: June 28, 2017 04:05 AM2017-06-28T04:05:50+5:302017-06-28T04:05:50+5:30
महाराष्ट्र राज्य वरिष्ठ मैदानी स्पर्धेत पुणे संघाने २२५ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपदाचा पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन करंडक जिंकला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंजवडी : महाराष्ट्र राज्य वरिष्ठ मैदानी स्पर्धेत पुणे संघाने २२५ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपदाचा पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन करंडक जिंकला. पुणेकरांचे हे लागोपाठ तेराव्या वर्षी विजेतेपद आहे.
शिवछत्रपती क्रीडानगरीमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत पुरुष गटात पुण्याचा कर्णधार चंद्रकांत मानवदकरच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या ७६ खेळाडूंच्या पथकाने ११८ गुण मिळवताना १२ सुवर्ण, ५ रौप्य, ७ ब्राँझ पदकांसह पुणे मॅरेथॉन सांघिक विजेता करंडक जिंकला. उपविजेतेपद मिळविणाऱ्या ठाणे जिल्हा संघाला केवळ ३८ गुण मिळाले.
महिला गटात अंकिता गोसावीच्या नेतृत्वाखाली महिला खेळाडूंनी ८ सुवर्ण, ४ रौप्य, ५ ब्राँझ पदके मिळवून १०७ गुणांसह पुणे मॅरेथॉन करंडक जिंकला, तर उपविजेतेपद मिळविणाऱ्या ठाणे संघाला ५५ गुण मिळाले.
या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुणे मॅरेथॉन चषक सातारच्या अनिरुद्ध गुजर व सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पुणे मॅरेथॉन चषक ठाण्याच्या दियाड्रा उधलिया हिला देण्यात आला.
जुलैमध्ये ओरियामध्ये होणाऱ्या आशियाई मैदानी स्पर्धेसाठी
निवडल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय पंच सतीश उचील, किशोर शिंदे, चंद्रकांत पाटील, मनीषा घाटे, शेखर कुदळे, रमेश बुढे, अतुल पाटील, शरद सूर्यवंशी, जयवंत माने यांचा सत्कार करण्यात आला.
पारितोषिक वितरण प्रल्हाद सावंत, अभय छाजेड, भाऊ काणे, राजू प्याडी, रमेश बुढे, शरद सूर्यवंशी, संजय बडोले, अतुल पाटील आदींच्या हस्ते झाले. प्रास्ताविक मधू डेचाई यांनी केले, तर आभार शेखर कुदळे यांनी मानले.