उद्योगनगरीतून १८२ कोटींच्या निवडणूक रोख्यांची खरेदी
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: March 17, 2024 12:53 AM2024-03-17T00:53:05+5:302024-03-17T00:53:27+5:30
निवडणूक रोख्यांचे पिंपरी-चिंचवड कनेक्शन.
पिंपरी : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार निवडणूक आयोगाने गुरुवारी (१४ मार्च) रात्री निवडणूक रोख्यांचा सर्व तपशील त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून जाहीर केला. त्यामध्ये देशभरातील अनेक नामांकित कंपन्या, व्यावसायिक किंवा वैयक्तिक खरेदीदारांचाही समावेश आहे. दरम्यान, यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील बड्या कंपन्यानी १८० कोटींच्या निवडणूक रोख्यांची खरेदी केल्याचे समाेर आले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराचेही कनेक्शन यामध्ये उघड झाले आहे.
राजकीय पक्षांचे मोठे देणगीदार कोण आहेत आणि ते कधी व कशासाठी देणगी देतात याचीही माहिती उघड झाली आहे. देशातील कंपन्या राजकीय पक्षांच्या मोठ्या देणगीदार आहेत. यामध्ये कोणत्या कंपनीने भारतीय स्टेट बँकेकडून किती निवडणूक रोखे खरेदी केले, कोणत्या पक्षाला किती रकमेचे निवडणूक रोखे मिळाले आहेत, कोणत्या पक्षाने किती कोटींचे निवडणूक रोखे वटवले आहेत, याबाबतची माहितीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यातून ही माहिती उघड झाली आहे.
राष्ट्रवादीला सगळ्यात कमी रोखे...
यादी प्रसिध्द केल्यानंतर, लाभार्थी पक्षांमध्ये भारतीय जनता पक्ष अर्थात भाजपला (६०६०.५ कोटी) सर्वाधिक लाभ झाला. या पक्षांसह इतर पक्षांमध्ये तृणमूल काँग्रेस(१६०९ कोटी), काँग्रेस पक्ष (१४२१.८७ कोटी), या पक्षांना निवडणूक रोख्यांचा लाभ झाला आहे. त्यानंतर दक्षिणेकडील पक्षांना भारत राष्ट्र समिती (१२१४.७० कोटी), बिजू जनता दल (७७५.५० कोटी), द्रविड मुन्नेत्र कळघम (६३९ कोटी), वायएसआर काँग्रेस (३३७ कोटी), तेलुगु देसम पक्ष (२१८ कोटी) रोख्यांचा लाभ सर्वाधिक झालेला दिसून येतो.महाराष्ट्रातील शिवसेनेचा क्रमांक (१५९.४० कोटी) यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला (३०.५० कोटींचा) लाभ झाला.
या आहेत पिंपरी-चिंचवडमधील कंपन्या...
१) बी. जी. शिर्के कंन्स्ट्रक्शन ॲण्ड टेक्नॉलाजी प्रा. लि. : ११७ कोटी
२) बजाज ऑटो : ४३ कोटी
३) फिनोलेक्स केबल्स : २० कोटी
४) नहार बिल्डर्स : १ कोटी ५० लाख