बनावट पॅनकार्डव्दारे क्रेडीट कार्ड मिळवून पाच लाखांची खरेदी करत फसवणूक;वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 06:10 PM2020-08-18T18:10:20+5:302020-08-18T18:25:01+5:30
आरोपीने फिर्यादी यांच्या नावे बनावट पॅनकार्ड तयार केले. त्याचा वापर करून एका बँकेचे क्रेडीट कार्ड मिळविले..
पिंपरी : बनावट पॅनकार्ड तयार करून त्याच्या आधारे क्रेडीट कार्ड मिळविले. त्यावरून पाच लाख रुपयांची खरेदी करून फसवणूक केली. सप्टेंबर २०१९ ते ६ डिसेंबर २०१९ दरम्यान हा प्रकार घडला.
लोकशकुमार महेशकुमार डिमोले (वय ४०, रा. वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. १७) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने फिर्यादी यांच्या नावे बनावट पॅनकार्ड तयार केले. त्याचा वापर करून एका बँकेचे क्रेडीट कार्ड मिळविले. त्याव्दारे पाच लाख रुपयांची खरेदी करून फिर्यादी यांची फसवणूक केली.
दरम्यान, फिर्यादी यांना याबाबत काही माहिती नव्हती. मात्र बँकेतून त्यांना फोन आला. क्रेडीट कार्डवर खरेदी केल्याचे पैसे भरा, असे बँकेतून त्यांना सांगण्यात आले. मात्र क्रेडीट कार्ड काढलेच नाही, तर खरेदी कशी करणार, असा प्रश्न फिर्यादी यांनी उपस्थित केला. त्यानंतरही बँकेच्या संबंधित विभागाकडून फिर्यादी यांना पैशांसाठी फोन येत होते. त्यामुळे त्यांनी बँकेच्या मुख्य शाखेत जाऊन क्रेडीट कार्ड विभागात याबाबत विचारणा केली. त्यावेळी क्रेडीट कार्डसाठीचा अर्ज, पॅनकार्ड आदी कागदपत्रे फिर्यादी यांना दाखविण्यात आली. मात्र त्यावर फिर्यादी यांची सही नसून ती बनावट असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच फोटो देखील दुसऱ्याचा वापरून कार्ड मिळविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या नावे बनावट पॅनकार्ड तयार करून त्याव्दारे क्रेडीट कार्ड मिळवून आरोपी याने फसवणूक केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार केली. वाकड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रवींद्र मुदळ तपास करीत आहेत.