क्रॉस व्होटिंगने दिला धक्का
By admin | Published: February 24, 2017 02:35 AM2017-02-24T02:35:58+5:302017-02-24T02:35:58+5:30
भाजपा वगळता अन्य राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी पॅनल टू पॅनल प्रचार करण्याऐवजी स्वत:पुरता
पिंपरी : भाजपा वगळता अन्य राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी पॅनल टू पॅनल प्रचार करण्याऐवजी स्वत:पुरता मर्यादित विचार केला. त्यामुळे क्रॉस व्होटिंग होऊन पॅनलच्या उमेदवारांना फटका बसला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला तीन ठिकाणी पॅनल निवडून आणण्यात यश मिळाले आहे. शिवसेनेला एकाही ठिकाणी पॅनल निवडून आणणे शक्य झाले नाही. भाजपाने तब्बल दहा ठिकाणी पॅनल निवडून आणले.
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या, तसेच शिवसेनेच्या उमेदवारांनी केवळ आपल्यापुरता विचार केला. नोत्या-गोत्याचाही त्यामध्ये विचार झाला. ज्याचा त्याने विचार केला. मला एक मत द्या, बाकी कोणालाही द्या अशी भूमिका घेऊन केलेला प्रचार त्यांच्या पक्षासाठी घातक ठरला.
भाजपाच्या उमेदवारांनी मात्र काहीही होवो, पॅनल टू पॅनल प्रचार करायचा, अशीच भूमिका घेऊन प्रचार यंत्रणा राबवली.
प्रभाग मोठा असल्याने सुमारे ५० हजार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचे एकीचे बळ कामी आले. अन्य राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मात्र स्वत:चा प्रचार करण्यासाठीही वेळ पुरला नाही. एकएकटे मतदारांपर्यंत जाणे त्यांना अवघड झाले. परिणामी ते मतदारांपर्यंत पोहोचू शकले नाहीत.
विकासकामे केली असताना, मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या यंत्रणेत राष्ट्रवादी कमी पडल्याने बॅकफूटवर जाण्याची वेळ आली.
काँग्रेस पक्षाला तर तब्बल ७० जागांवर उमेदवार देता आले नाहीत. नियोजनाचा अभाव आणि पूर्ण ताकदीने निवडणूक रिंगणात न उतरल्याने काँग्रेस खातेही खोलू शकली नाही.
(प्रतिनिधी)
योजनांचा अभाव : प्रचारयंत्रणा राबविली नाही
राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपाच्या उमेदवारीवर निवडणूक रिंगणात अनेकजण उतरले. अनेक दिग्गज राष्ट्रवादीतून भाजपात गेले. राष्ट्रवादीला खिंडार पडले. त्यानंतर सावध पवित्रा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचार यंत्रणा राबविणे आवश्यक होते. मात्र विकासकामांच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी यश खेचून आणेल, असा विश्वास बाळगून राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक लढवली. परंतु विकास केला असला, तरी राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेत असताना मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपाने केला. हाच मुद्दा त्यांनी मतदारांवर बिंबविण्याचा प्रयत्न केला.