संतपीठावर राजकीय व्यक्तींना ठेवले दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 12:11 AM2019-01-09T00:11:56+5:302019-01-09T00:12:22+5:30
विधी समितीमध्ये शिक्कामोर्तब : बहुमताने ठरावाला मंजुरी
पिंपरी : महापालिकेतर्फे टाळगाव चिखली येथे उभारण्यात येणाऱ्या जगद्गुरू संत तुकाराममहाराज संतपीठामध्ये सीबीएससी बोर्डाचा अभ्यासक्रम असून, त्यासाठी महापालिकेतर्फे संचालक मंडळाची रचना जाहीर केली आहे. संतपीठावर राजकीय व्यक्तींना दूर ठेवण्यावर विधी समितीने शिक्कामोर्तब केले. ठरावाच्या बाजूने पाच, तर विरोधात चार मते पडली. प्रशासकीय समिती करण्यास राष्टÑवादी आणि शिवसेनेने विरोध दर्शविला आहे.
वारकरी संप्रदायाचा प्रसार व प्रचार व्हावा, पारंपरिक शिक्षण मिळावे, या उद्देशाने हे संतपीठ उभारण्यात येत आहे. या संतपीठ उभारणीला १३ मे २०१५ रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता दिली होती. ती देण्यात आल्यानंतर माध्यमिक शाळेसाठी आरक्षित चिखलीतील १ हेक्टर ८० गुंठे जागा महापालिकेला देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली. यात निवासी स्वरूपाचे, प्राथमिक शाळेपासून ते उच्च पदवीपर्यंतचे केवळ संतसाहित्यावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे. येथे वसतिगृह, सभागृह, अभ्यासवर्ग आदींचा समावेश असणार आहे. येथील शाळेमध्ये सर्वधर्मीय विद्यार्थ्यांना प्रवेश असून, हे संतपीठ मराठी माध्यमातून शिक्षण देणारे असणार आहे.
सुमारे ४५ कोटी रुपये इतका खर्च या संतपीठ उभारणीसाठी येणार आहे. ना नफा ना तोटा तत्त्वावर कंपनी स्थापन केली आहे. संतपीठामध्ये मुलांचे शिक्षण सीबीएससी बोर्डाचे होणार आहे.
असे आहे संचालक मंडळ
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली नऊ जणांचे संचालक मंडळ स्थापन केले आहे. पदसिद्ध संचालक आणि पदसिद्ध सचिव म्हणून मुख्य लेखा अधिकारी जितेंद्र कोळंबे, प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, माध्यमिकचे प्रभारी शिक्षणाधिकारी पराग मुंढे आणि कायदा विभागाचे प्रभारी कायदा सल्लागार चंद्रकांत इंदलकर हेही पदसिद्ध सदस्य आहेत. याशिवाय संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, हभप राजूमहाराज ढोरे, तानाजी शिंदे आणि तज्ज्ञ सल्लागार स्वाती मुळे हे सदस्य असणार आहेत. येत्या सर्वसाधारण सभेत हा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.