दुचाकीवरून जाणाऱ्या दाजी अन् मेव्हण्यावर काळाचा घाला; ट्रेलरचे चाक डोक्यावरून गेले
By प्रकाश गायकर | Published: February 9, 2024 04:32 PM2024-02-09T16:32:12+5:302024-02-09T16:32:24+5:30
ट्रेलरच्या चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत दुचाकीला धडक दिली
पिंपरी : कुदळवाडी येथे एका दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना ट्रेलरने धडक दिली. धडक दिल्यानंतर खाली कोसळलेल्या दुचाकी चालकाच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेल्या त्यांच्या मेव्हण्याच्या हातावरून ट्रेलरचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना १७ जानेवारीला कुदळवाडी येथे घडली. हिरालाल नानहक कुमार (२०) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी संदिपकुमार लक्ष्मण बिंद ( २०, रा. चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिला आहे. त्यानुसार अज्ञात ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या ओळखीचे हिरालाल कुमार त्यांचा मेव्हणा बिरेशकुमार बिंद याला दुचाकीवरून घेऊन निघाले होते. कुदळवाडी पुलाच्या दिशेने जात असताना एम एच १४ एच यु ७४३७ या ट्रेलरच्या चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत दुचाकीला धडक दिली. धडक दिल्यानंतर दुचाकीवरील दोघेही खाली पडले. दुचाकी चालवत असलेल्या हिरालाल कुमार यांच्या डोक्यावरून ट्रेलरचे चाक गेले. तर त्यांचा मेव्हणा बिरेशकुमार बिंद यांच्या उजव्या हाताच्या खांद्यावरून चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघात झाल्यानंतर चालक ट्रेलरसह पसार झाला असून पोलिस तपास करत आहेत.