महापालिकेच्या जागेत जाहिराती लावताय; मग होणार गुन्हा दाखल, पिंपरीत घडली अशीच घटना...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 07:55 PM2021-08-26T19:55:16+5:302021-08-26T19:55:44+5:30
जाहिरात लावून आरोपींनी उड्डाणपुलाचे विदृपण केले
पिंपरी : शहरात कोणत्याही जागेचा विचार न करता सार्वजनिक ठिकाणी पोस्टर आणि जाहिराती लावल्या जातात. दिवसेंदिवस त्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. बसस्टॉप, पूल, लाईटचे खांब, अशा ठिकाणी हे अधिक प्रमाणत दिसून येत आहेत. पिंपरीतही महापालिकेच्या सार्वजनिक जागेत अनधिकृतपणे जाहिरात लावल्या प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
गुजरनगर उड्डाणपूल, थेरगाव येथे बुधवारी (दि. २५) सकाळी हा प्रकार घडला. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य निरीक्षक सुरेश भवरलाल चन्नाल यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. प्रमोद अमोल पारसुकर, साक्षी लोखंडे (रा. कुंदननगर, कासारवाडी), अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरनगर उड्डाणपूल, थेरगाव येथे आरोपींनी महापालिकेची परवानगी न घेता अनधिकृतपणे जाहिरात लावली. जाहिरात लावून आरोपींनी उड्डाणपुलाचे विदृपण केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत सार्वजनिक मालमत्तेचे विरूपणास प्रतिबंध कायदा कलम ३ नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.