पिंपरी चिंचवड महापालिकेत पाण्यावरून रणकंदन, प्रशासनाच्या कारभारावर उपमहापौर संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 12:37 PM2020-09-23T12:37:55+5:302020-09-23T12:38:53+5:30
पवना धरण शंभर टक्के भरल्यामुळे मुबलक पाणी असूनही शहरातील विविध भागात पाणीटंचाई जाणवत आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रास पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरण शंभर टक्के भरल्यामुळे मुबलक पाणी असूनही शहरातील विविध भागात पाणीटंचाई जाणवत आहे. पवना धरण भरले असतानाही पाणीप्रश्न गंभीर झाल्याने पदाधिकारी आणि प्रशासन अशी बैठक मंगळवारी झाली. या बैठकीत पाणीपुरवठा विभागाने अपुरी माहिती दिल्याने उपमहापौर तुषार हिंगे बैठकीतून निघून गेले. पाणीपुरवठा विभाग नागरिकांच्या भावनांशी खेळत असल्याची टीका केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका महापौर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली पाणीपुरवठ्याविषयी बैठक झाली. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, नगरसदस्य अभिषेक बारणे, तुषार कामठे, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रामदास तांबे व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
एकाही प्रश्नाचे उत्तर देता आले नाही?
बैठकीत पाणीपुरवठाविषयक प्रश्नांबाबत लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्या. तसेच उपमहापौरांनी तर १५ प्रश्न विचारले होते. शहरात गढूळ पाणीपुरवठा होत आहे, त्याकडे पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
...................
उपमहापौरांनी व्यक्त केला राग
प्राधिकरण सेक्टर २३ मधील जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी प्रक्रिया न करताच नागरिकांना पुरविले जात आहे. त्यामुळे दूषित पाणीपुरवठा होत आहे, अशी तक्रार उपमहापौरांनी केली. त्यावर याबाबत काही माहिती असल्यास प्रशासनास द्यावी, असे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच यावेळी महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांनीही पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यायला हवी, अशी मागणी केली. त्यावर पाणीपुरवठा विभागाला समाधानकारक उत्तर देता आले नाही. प्रशासनास समाधानकारक उत्तर देता आले नाही, ही बाब चुकीची आहे. नागरिकांच्या आरोग्याशी पाणीपुरवठा विभागाने खेळू नये, असे चिडून उपमहापौरांनी सभात्याग केला.
....................................
बैठकीत ऐनवेळी सदस्यांनी काही मुद्दे उपस्थित केले. तक्रारीबाबतची माहिती त्यावेळी माझ्याकडे उपलब्ध नव्हती. पाण्यासंदर्भात सर्वसाधारण जी माहिती उपलब्ध होती ती मी सांगितली. त्यामुळे कनिष्ठ सहाकाऱ्यांशी बोलून, पाणीपुरवठ्याच्या प्रश्नांबाबत माहिती घेऊन पुढील बैठकीत सादर करण्यात येईल.
-रामदास तांबे, सह शहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग