नळावरील भांडण गेले थेट पोलिस स्टेशनात! पाण्याच्या कारणावरून शेजाऱ्यांमध्ये ‘राडा’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 06:19 PM2022-03-22T18:19:19+5:302022-03-22T18:21:30+5:30
परस्परविरोधात गुन्हे दाखल..
पिंपरी : नळाच्या पाण्याच्या कारणावरून शेजाऱ्यांमध्ये वाद झाला. जातीवाचक शिवीगाळ तसेच विनयभंग केल्याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात परस्परविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. सहयोगनगर, तळवडे येथे रविवारी (दि. २०) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.
पहिल्या प्रकरणात ३२ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली. त्यानुसार एका महिलेसह तिघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी एकमेकांचे शेजारी आहेत. फिर्यादीची मुलगी राहत्या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या सामाईक नळावर पाणी भरण्यासाठी गेली. त्यावेळी आरोपींनी तिला पाणी भरू दिले नाही. त्यामुळे फिर्यादीची पत्नी नळावर गेली असता आरोपींनी त्यांना मारहाण करून शिवीगाळ केली. त्यावेळी फिर्यादी तेथे गेले असता आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ केली. आमच्याकडे पाणी भरायला येऊ नको, असे म्हणून जातीवाचक बोलून दगड फेकून मारून तसेच लोखंडी राॅडने मारून फिर्यादीला जखमी केले.
याच्या परस्पर विरोधात पीडित महिलेने फिर्याद दिली. त्यानुसार एका महिलेसह तिघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या दुकानामधून घरामध्ये पाणी भरण्यासाठी गेल्या. त्यावेळी आरोपी महिलेने घरामध्ये प्रवेश केला. तू पाणी का भरते, तुमच्यामुळे मला पाणी भेटत नाही, असे बोलून आरोपी महिलेने फिर्यादीला ओढत घराबाहेर आणले. इतर आरोपींनी मनास लज्जा उत्पन्न करून फिर्यादी महिलेचा विनयभंग केला. तसेच शिवीगाळ करून फिर्यादी महिलेला हाताबुक्क्याने मारहाण केली. फिर्यादीला मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.