पिंपरी-चिंचवडमध्ये भाईगिरीतून दोन गटात तुफान राडा; कोयता, चाकूने वार करून खुनी हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 04:18 PM2022-05-17T16:18:58+5:302022-05-17T16:22:00+5:30
रात्री बारा ते सव्वाबाराच्या सुमारास ही घटना घडली...
पिंपरी : आम्ही भाई आहोत, आमच्या नादाला लागला तर गेम करतो तसेच आमच्या एरियात तुम्हाला माझी दहशत दाखवतो, असे म्हणत धमकी दिली. तसेच दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. राॅड, कोयता, चाकूने वार करण्यात आले. गर्दी मारामारी करून खुनी हल्ला केल्याप्रकरणी १३ जणांवर चिखली पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. पवारवस्ती, चिखली येथे सोमवारी (दि. १६) रात्री बारा ते सव्वाबाराच्या सुमारास ही घटना घडली.
राहुल रमेश रेड्डी (वय १८, रा. कासारवाडी), गणेश पवार (रा. पवारवस्ती, चिखली) अशी जखमींची नावे आहेत. राहुल यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. गणेश चंद्रकांत सिंगुलवार (वय २१, रा. कुदळवाडी, चिखली) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्यासह कमलेश क्षीरसागर, दानेश, आदित्य पुजारी, सिराज अन्सारी, बाजीराव मिसाळ, अक्षय शेडगे (रा. कुदळवाडी, चिखली) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमवारी रात्री त्यांचा मित्र गणेश पवार याच्या दुकानात कपडे खरेदीसाठी गेले. कपडे खरेदी केल्यानंतर रात्री उशिरा ते दुकानातून घरी पायी चालत निघाले. त्यावेळी आरोपी एका रिक्षातून आले आणि त्यांनी गर्दी जमविली. गणेश पवार सोबत पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून कमलेश क्षीरसागर याने गणेश याला धमकावले. का रे तुला मस्ती आली का. तू भाई झाला का, असे म्हणून रॉडने गणेशला मारले. आम्ही कुदळवाडीचे भाई आहोत, आमच्या नादाला लागला तर तुझी गेम करतो' असे म्हणत दानेश याने गणेशला शिवीगाळ करून हाताबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी राहुल हे भांडण सोडविण्यासाठी गेले. सिराज अन्सारी याने त्याच्याकडील चाकूने फिर्यादीवर चाकूने वार करत खुनी हल्ला केला, असे फिर्यादीत नमूद आहे.
याच्या परस्पर विरोधात गणेश चंद्रकांत सिंगुलवार (वय २१, रा. कुदळवाडी, चिखली) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार गणेश पवार, नन्या पवार, वृषभ मांडके, घनश्याम यादव उर्फ बंटा, राहुल मेड्डी, ओंकार आंग्रे (सर्व रा. कुदळवाडी, चिखली) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे मित्र फिर्यादीच्या रिक्षामधून जात होते. त्यावेळी आरोपी गणेश पवार हा रस्त्याने जाताना दिसल्याने कमलेश क्षीरसागर याने रिक्षा थांबवण्यास सांगितले. दानेश व कमलेश हे दोघेजण रिक्षातून उतरून गणेश पवार याच्याकडे गेले. तुमच्या एरियात आल्यावर मला ढोस देता का, आता तुम्ही माझ्या एरियामध्ये आला आहे. आत्ता तुम्हाला दाखवतो माझी दहशत कशी आहे ते, असे म्हणून गणेश पवार याने दानेशला मारहाण केली. त्यानंतर गणेश पवार याने त्याच्या पाच साथीदारांना बोलावून फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना चाकू, कोयत्याने मारले. दगड व सिमेंटचे ब्लाॅक फिर्यादीच्या रिक्षावर मारून रिक्षाची तोडफोड करून नुकसान केले.
आता तुम्हाला दाखवतो, आमच्या भाईला नडता काय? तुमचा माज उतरवितो, असे म्हणून वृषभ मांडके आणि घनश्या यादव यांनी त्यांच्या हाताततील कोयते हवेत फिरविले. ते पाहून फिर्यादीचे मित्र हे सर्वजण तेथून पळून गेले. त्यानंतर फिर्यादीचा मित्र कमलेश क्षीरसागर याला शोधत आरोपी त्याच्या घरी गेले. त्याच्या घराच्या दरवाजावर कोयते मारले, त्याच्या गाडीवर कोयते मारून गाडीची तोडफोड करून नुकसान केले. आमच्या नादी लागला तर एकएकांना कापून टाकीन, अशी धमकीही आरोपींनी कोयते फिरवून दिली. कमलेशच्या आईला दमदाटी केली. कुठे आहे तुझा मुलगा, घरात लपून बसला आहे काय, काढ त्याला बाहेर, त्याचा तुकडाच पाडतो, अशी धमकी आरोपींनी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.