Pimpri Chinchwad: लघुशंकेवरून भांडण, खुनी हल्ला करत कोयत्याने वार; दोघांना अटक
By नारायण बडगुजर | Published: December 30, 2023 06:21 PM2023-12-30T18:21:03+5:302023-12-30T18:21:28+5:30
वाकड येथील भुमकर चौकात शुक्रवारी (दि. २९) रात्री दीड ते सव्वादोनच्या सुमारास ही घटना घडली...
पिंपरी : अंडाभुर्जीच्या गाड्याच्या बाजूला लघुशंका करण्याच्या कारणावरून किरकोळ भांडण झाले. त्याचा राग मनात धरून तरुणावर कोयत्याने वार करून खुनी हल्ला केला. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. वाकड येथील भुमकर चौकात शुक्रवारी (दि. २९) रात्री दीड ते सव्वादोनच्या सुमारास ही घटना घडली.
निखील देवदत्त सूर्यवंशी (२९, रा. भुमकर चौक, वाकड) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. चेतन उर्फ श्रीपती भिवाजी कातपुरे (वय २२), ऋतिक भिवाजी कातपुरे (२०, दोघेही रा. थेरगाव) यांना अटक केली असून त्यांच्यासह त्यांच्या दोन अनोळखी साथीदारांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सूर्यवंशी व त्यांचे मित्र आकाश जाधव, विशाल अडसूळ, अष्मांतक भोसले हे अंंडाभुर्जी खाण्यासाठी गेले होते. त्यावेळी अंडाभुर्जीच्या गाड्याच्या बाजूला लघुशंका करण्याच्या कारणावरून त्यांची आणि चेतन कातपुरे व ऋतिक कातपुरे यांच्याशी किरकोळ भांडण झाले. त्याचा राग मनात धरून अंडाभुर्जी चालविणारा चेतन कातपुरे व त्याचा भाऊ ऋतिक कातपुरे तसेच त्यांचे दोन अनोळखी साथीदार यांनी विशाल अडसूळ याचा पाठलाग करून त्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच आकाश जाधव याच्या डोक्यात, तोंडावर, गळ्यावर, पाठीवर, कानावर लोखंडी कोयत्याने जिवे ठार माण्याच्या उद्देशाने वार करून त्यास गंभीर जखमी केले.
किती दिवस लपून बसणार, तुला आम्ही कोण आहे माहीत नसेल तर विचारून घे, आमच्या नादी ईथे कोण लागत नाही. आता वाचलात पुन्हा सोडणार नाही, असे फिर्यादी चेतन यांना बोलून त्यांनी सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण केली. पोलिस उपनिरीक्षक सी. एम. बोरकर तपास करीत आहेत.