‘अनधिकृत’चा प्रश्न ‘जैसे थे’
By admin | Published: February 16, 2017 03:12 AM2017-02-16T03:12:57+5:302017-02-16T03:12:57+5:30
राज्यात सत्तेत येण्यापूर्वी अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचे, शास्तीकराचा प्रश्न, रेड झोन प्रश्न सोडविण्याचे आश्वासनांचे गाजर दाखविले होते.
पिंपरी : राज्यात सत्तेत येण्यापूर्वी अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचे, शास्तीकराचा प्रश्न, रेड झोन प्रश्न सोडविण्याचे आश्वासनांचे गाजर दाखविले होते. मात्र एकही आश्वासन पूर्ण करता आले नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली.
पिंपळे सौदागर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार अण्णा बनसोडे, माजी महापौर योगेश बहल, राष्ट्रवादीचे नेते नाना काटे, जगदीश शेट्टी, फजल शेख उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांवर टीका करताना पवार म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री बोलबच्चन आहेत. पिंपरी-चिंचवडच्या प्रश्नावर कितीदा भेट दिली. चर्चा केली, प्रश्न सोडविले, हे सांगावे. शास्ती रद्दचा शासनादेश अपलोडच झाला नसल्याचे बेजबाबदार आणि हास्यास्पद वक्तव्य करतात. मलिदा मिळविण्यासाठी आम्ही शहरात कधीच काम केले नाही. खोटी आश्वासने देत नाही. या अडीच वर्षांत भाजपाने शहराला काय दिले? शपथ घेणे ही केवळ नौटंकी आहे. पालकमंत्र्यांनी पिंपरी-चिंचवडकडे दुर्लक्ष केले.’’ आम्ही कधीही गुंडांचे समर्थन केलेले नाही. भाजपावाले मात्र गुंडांचे समर्थन करीत आहेत. मुख्यमंत्र्यांकडेच गृहखाते असताना राज्यभरात गुन्हेगारी वाढत आहे. पोलिसांना मार खावा लागतो आहे. या गृहमंत्र्याच्या काळात गुंडांचे फावते आहे आणि हेच भयमुक्त शासन देण्याचे हास्यास्पद आश्वासन देत आहेत, असे पवार म्हणाले. (प्रतिनिधी)