आज पडणारे प्रश्न उद्याचे संशोधन ठरेल
By admin | Published: January 9, 2017 02:36 AM2017-01-09T02:36:49+5:302017-01-09T02:36:49+5:30
विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण व्हावी, हा तसा महत्त्वाचा विषय आहे. लोक पदवीधर होतात; परंतु त्यांचे वाचन कमी असते. शिक्षणाचे प्रमाण वाढतेय
निगडी : विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण व्हावी, हा तसा महत्त्वाचा विषय आहे. लोक पदवीधर होतात; परंतु त्यांचे वाचन कमी असते. शिक्षणाचे प्रमाण वाढतेय. नुसते पदवीधर होण्याने पुढे काही घडत नाही. वाचनामुळे कल्पनाशक्तीला वाव मिळतो. अनेक मोठी माणसे वाचनानेच घडली आहेत. जगात ग्रह, तारे, विमाने अशा कल्पना मांडल्या गेल्या. त्या दिशेने शोध लागत गेले, अशा गोष्टी वाचल्याशिवाय आणि जगाकडे उघड्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय मनुष्याची प्रगती अशक्य आहे,असे प्रतिपादन
८६व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले.
निगडीतील कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या प्रेरणा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये झालेल्या दिशा सोशल फाउंडेशनच्या साहित्यिक आपल्या दारी उपक्रमात ते बोलत होते. या वेळी संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती, उपकार्याध्यक्ष अण्णासाहेब भोसले, मानद सचिव बाबूराव जवळेकर, खजिनदार वसंत पवार, प्राचार्या शुभांगी इथापे, अध्यक्ष गोरख भालेकर, कार्याध्यक्ष सचिन साठे, शिक्षण मंडळाचे
माजी उपसभापती नाना शिवले उपस्थित होते.
डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, ‘‘मुलांच्या दृष्टीने जगणे जितके महत्त्वाचे तितकेच जगण्याकडे उघड्या डोळ्यांनी बघणेही महत्त्वाचे असते. मुलांनी सतत प्रश्न विचारले पाहिजेत. कारण जगात जिथे प्रश्न निर्माण होतात तिथेच नवीन काही घडत असते. प्रश्न विचारणे हे ज्ञानाच्या शोधार्थ निघण्याची पहिली खूण असते. याकरिता मुलांच्या मनात प्रश्न निर्माण होण्यासाठी आणि विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देण्यासाठी शिक्षक आणि पालकांनी आपला व्यासंग वाढविला पाहिजे. ’’
शिवले यांनी प्रास्ताविक केले. संजय कुऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन केले. चेतन महाजन यांनी आभार मानले. उपक्रमाचे संयोजन बाळू गावडे, किरण थोरात, रवींद्र खेडकर व दिशाचे संचालक गुरुदास भोंडवे, प्रवीण कुदळे, नंदकुमार कांबळे, रोहित खर्गे, किशोर जवळकर, संतोष चांदेरे, अविनाश ववले, महेंद्र चिंचवडे, विजय कांबळे यांनी केले. (वार्ताहर)