सामाजिक देखाव्यांतून मांडले प्रश्न, सार्वजनिक गणेश मंडळांची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 01:25 AM2017-08-28T01:25:05+5:302017-08-28T01:25:15+5:30
जुनी सांगवीतील सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक-सांस्कृतिक देखाव्यांसह अनेक ज्वलंत प्रश्नही देखाव्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
सांगवी : जुनी सांगवीतील सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक-सांस्कृतिक देखाव्यांसह अनेक ज्वलंत प्रश्नही देखाव्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
सांगवीतील जुनी सांगवी आणि नवी सांगवी परिसरात जवळपास लहान-मोठी २०० मंडळे गणपती उत्सव साजरा करतात. सात दिवस सांगवीतील गणेशोत्सव असून, या कालावधीत अनेक उपक्रम आणि देखावे सादर केले जातात. हे गणपती पाहण्यासाठी दूर अंतरावरुन भाविक येत असतात.
जुनी सांगवीतील आनंदनगर येथील आनंदनगर मित्र मंडळमंडळाने मोबाइलचा अतिवापर टाळा या महत्त्वाच्या विषयावर जिवंत देखावा केला आहे. समाजात मोबाइलचा अतिवापर कसा घातक आणि त्रासदायक ठरू पाहत आहे हे आपण कसे टाळायला हवे याविषयी मंडळाचे अध्यक्ष लिओ जुल्स आणि सहकारी कार्यकर्त्यांनी मंडळाच्या माध्यमातून लोकांना जागृती निर्माण होण्यासाठी पाऊल उचलले आहे.
तसेच विद्यानगर मित्र मंडळ संस्कृती ग्रुप मंडळाने याही वर्षी फुलापासून कासव तयार केले असून, गेल्या वर्षी फुलांची बैलगाडी हा देखावा निर्माण केला होता. हिंदू धर्मात कासवास महत्त्व असून कासवाची पूजा केली जाते या संकल्पनेतून फुलांचे कासव
निर्माण केल्याचे मंडळाचे अध्यक्ष प्रशांत देवकाते यांनी सांगितले. मंडळाचे १९वे वर्ष असून देखावा आकर्षक आहे.
प्रेमराज हाइट्स मित्र मंडळाकडून यंदा रक्तदान शिबिर घेण्यात आले. परिसरातील जवळपास ८० लोकांनी आणि मंडळातील कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. हे रक्त इंडियन सिरॉलॉजिकल इन्स्टिट्यूट यांना दिले गेले. गरजूंना त्वरित रक्त मिळावे हा हेतू असल्याचे मंडळाचे अध्यक्ष ओंकार कुंभार यांनी सांगितले.
पौराणिक देखाव्यांवर भर
चिखली, जाधववाडी परिसरात गणरायाचे दणक्यात आगमन झाल्यानंतर सार्वजनिक मंडळांचे देखावेदेखील सुरूझाले आहेत. यंदा चिखली, जाधववाडी या परिसरात सामाजिक, पौराणिक देखाव्यांवर भर देण्यात आला आहे.
हिंदवी स्वराज युवा मंचाच्या बाप्पाचे आगमन मोठ्या जल्लोषात झाले. यंदा हार-फुले याऐवजी एक पेन व एक वही गणेश भक्तांकडून स्वीकारली जाणार आहे. तसेच दान स्वरूपात आलेल्या वह्या अनाथाश्रमात वाटल्या जाणार आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सतीश चव्हाण व सचिव चंद्रकांत पांढरे यांनी दिली. यंदाचा देखावा राज्यातील वाढती समस्या शेतकरी आत्महत्या या सरकारला रोखता आल्या नाही. याच ठिकाणी शिवाजीमहाराज असते तर काय झाले असते, यावर भाष्य करणारा आहे.
आहेरवाडी येथील जय बजरंग मंडळ मंडळाने पौराणिक देखावा सादर केला आहे. महागाई, महिलांवरील वाढते अत्याचार, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या अशा अनेक समस्यांच्या राक्षसाचा वध करण्यात आला आहे. मंडळाचे अध्यक्ष विक्रांत आहेर व उपाध्यक्ष प्रवीण आहेर आहेत.
श्री संत सावता माळी तरुण मंडळाने माता-पित्याची सेवा हीच ईश्वर सेवा या विषयावर देखावा सादर केला आहे. एक छोटा मुलगा आई-वडिलांना घराबाहेर काढणाºया स्वत:च्या वडिलांना मोलाचा सल्ला देतानाचे म्हणजेच जर तुम्ही त्यांना आज घराबाहेर काढलेत, तर मीही मोठा झाल्यावर तुम्हाला असेच घराबाहेर काढेन, असा संदेश दिला आहे. आहेरवाडी येथील श्री शिव छत्रपती मित्र मंडळाने चिनी वस्तूंना फाटा देत भारतीय संस्कृतीनुसार पर्णकुटी हा देखावा सादर केला.