घरकुलाच्या अर्जासाठी रांग
By admin | Published: May 12, 2017 05:14 AM2017-05-12T05:14:41+5:302017-05-12T05:14:41+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महापालिकेने शहरातील झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करण्याबरोबरच घरांसाठी नागरिकांकडून अर्जही मागविले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या सहा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अर्ज सादर करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यामुळे अर्ज देण्यासाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना उन्हाचा त्रास होत आहे, याची दखल आज झालेल्या स्थायी समितीत घेण्यात आली.
‘‘सहा क्षेत्रीय कार्यालयांच्या ठिकाणी नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि सावलीची व्यवस्था करावी, अशी सूचना स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी प्रशासनाला केली.
स्थायी समिती सभेत सावळे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा मुद्दा उपस्थित केला. त्या सावळे म्हणाल्या, ‘‘प्रधानमंत्री आवास ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू आहे. देशातील प्रत्येकाकडे स्वत:चे घर असावे याचे स्वप्न त्यांनी पाहिले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही योजना राबविण्याचा निर्णय घेऊन घर नसणाऱ्या नागरिकांना दिलासा दिला आहे. या योजनेअंतर्गत शहरातील रहिवासी असलेल्या पण स्वत:चे घर नसणाऱ्या प्रत्येकाला घर उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. त्यासाठी नागरिकांकडून अर्ज मागविले आहेत. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अर्ज सादर करण्यासाठी नागरिकांना १६ मेपर्यंत मुदत दिली आहे.