औद्योगिक भागातील प्रश्न त्वरित सोडवा, उद्योजकांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 01:14 AM2018-11-15T01:14:55+5:302018-11-15T01:15:18+5:30
उद्योजकांची मागणी : भोसरीत बैठक
पिंपरी : फोरम आॅफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनची नुकतीच बैठक झाली. पिंपरी, चाकण आणि आंबेगाव परिसरातील औद्योगिक प्रश्नाबाबत चर्चा झाली. औद्योगिक भागातील वाहतूक प्रश्न सोडवा, अशी मागणी करण्यात आली. भोसरी येथे उद्योजकांची बैठक झाली. या वेळी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, फोरमचे अध्यक्ष अभय भोर, शिवसेनेच्या संघटिका सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट आदी उपस्थित होते.
या वेळी पिंपरी-चिंचवड, चाकण, एमआयडीसी परिसरातील अनेक अडचणी व समस्या सांगितल्या. आंबेगाव तालुक्यात मिलेनियम बिझनेस पार्क करण्यात येणार आहे, त्यासाठी भोसरी एमआयडीसी परिसरात उद्योजकांसाठी एक कायमस्वरूपी उद्योग मित्र कार्यालय उभारावे. शासकीय परवानग्या, भांडवल व जागा याचे प्रश्न सोडविण्यात येतील, असेही या वेळी सांगण्यात आले. एमआयडीसीतील उद्योजकांचे प्रश्न आणि आजारी उद्योगांचे प्रशिक्षण केंद्र, मेट्रो रेल्वे इत्यादी विषयांवरही चर्चा झाली. चाकण येथील वाहतूक समस्या, पिंपरी-चिंचवड परिसरात पर्यावरण उद्योगात उद्योजकांसाठी इतर सुविधा द्याव्यात, मोशी व चाकण येथे ओव्हरब्रिज करावा, अशी मागणी केली. त्यावर खेड आणि नारायणगाव घाटातील काम पूर्ण होईल. खेडपासून २५ किलोमीटर बायपासचे काम झालेले आहे. उर्वरित १३ किलोमीटरचे काम लवकरच पूर्ण होईल. मेट्रो रेल्वे नाशिक फाटा ते आंबेठाण गावापर्यंत नेण्यात येईल, अशी माहिती या वेळी देण्यात आली. यावर आढळराव पाटील यांनी उद्योजकांच्या प्रश्नाबाबत उद्योग मंत्र्यांबरोबर लवकरच बैठक घेण्यात येईल, असे सांगितले.