अपघातानंतर आयटी कंपनीतील नोकरी सोडली; अशातच १० ते २० टक्के परताव्याच्या आमिषाने ९९ लाखांना गंडला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 09:58 AM2024-05-06T09:58:04+5:302024-05-06T09:58:20+5:30
ट्रेकिंगदरम्यान अपघात झाल्याने नोकरी सोडली, सध्या बेरोजगार असताना इंजिनियरची ९९ लाखांची फसवणूक झाली
पिंपरी : गुंतवणुकीवर दररोज १० ते २० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून आयटी इंजिनियरची ९९ लाख रुपयांची फसवणूक केली. रहाटणी येथे २२ ते ३० एप्रिल २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला.
फसवणूक झालेल्या ४५ वर्षीय आयटी इंजिनियरने (रा. रहाटणी, मूळ रा. मध्यप्रदेश) याप्रकरणी शनिवारी (दि. ४) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आयटी इंजिनियर एका अनोळखी क्रमांकावरून व्हाट्सअप कॉल आला. फोनवरील व्यक्तीने मोतीलाल ओसवाल कंपनीमध्ये गुंतवणूक करा, असे सांगितले. या गुंतवणुकीवर दररोज १० ते २० टक्के परतावा देऊ, असे आश्वासन दिले. त्यानंतर फिर्यादीस एक लिंक पाठवून त्यांना एक ॲप्लिकेशन इन्स्टॉल करण्यास सांगितले. सुरुवातीला फिर्यादीकडून ५० हजार रुपये, त्यानंतर चार लाख रुपये व त्यानंतर १० लाख रुपये घेतले. यातील काही रक्कम फिर्यादीने त्यांच्या पत्नीच्या खात्यावरून दिली. हे पैसे घेतल्यानंतर संशयितांनी फिर्यादी यांच्या बँक खात्यातून १५ वेळा ट्रांजेक्शन करून पैसे घेतले.
दरम्यान, फिर्यादी इंजिनियरने गुंतवणूक करण्यासाठी कर्ज घेतले. कर्जाची रक्कम देखील गुंतवणूक म्हणून संशयितांना दिली. मात्र, संशयितांनी कोणताही परतावा न देता तसेच फिर्यादी इंजिनियरने गुंतवणूक केलेली रक्कम परत न करता त्यांची ९९ लाख १७ रुपयांची फसवणूक केली. सहायक पोलिस निरीक्षक परवेज शिकलगार तपास करीत आहेत.
आधीच बेरोजगार त्यात कोटीचा गंडा
फिर्यादी इंजिनियर हे एका आयटी कंपनीमध्ये नोकरीला होते. मात्र, ट्रेकिंगदरम्यान त्यांना अपघात झाला. यात ते जखमी झाले. जखमी झाल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली. त्यामुळे फिर्यादी इंजिनियर सध्या बेरोजगार आहेत. असे असताना त्यांची फसवणूक झाली.