भाजपा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांचे नगरसेवक पद धोक्यात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 05:56 PM2018-07-01T17:56:03+5:302018-07-01T18:00:40+5:30
भाजपा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या कुणबी जात प्रमाणपत्राची फेरपडताळणी करण्यात यावी, या बाबतचा अहवाल २९ सप्टेंबर २०१८ पर्यंत सादर करावा. असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला दिले आहेत.
पिंपरी : भाजपा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या कुणबी जात प्रमाणपत्राची फेरपडताळणी करण्यात यावी, या बाबतचा अहवाल २९ सप्टेंबर २०१८ पर्यंत सादर करावा. असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला दिले आहेत. अशी माहिती याचिकाकर्ते कैलास कुंजीर यांनी पत्रकार परिषदेत रविवारी दिली.
महापालिकेत सद्या महापौर बदलाचे वारे वाहू लागले असून शत्रुघ्न काटे महापौरपदाचे दावेदार आहेत. मात्र त्यांच्यापुढे जात प्रमाणपत्राच्या प्रकरणाने अडचण निर्माण झाली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत रहाटणी-पिंपळे सौदागर (प्रभाग क्रमांक २८) मधून ओबीसी राखीव प्रवर्गातून शत्रुघ्न काटे यांनी भाजपाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली आहे. मात्र, बनावट कुणबी दाखल्याच्या आधारे त्यांनी निवडणूक लढविल्याबद्दल बाळासाहेब काकरे तसेच कैलास कुंजीर यांनी आक्षेप नोंदवला. तसेच याप्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली. दाखल केलेल्या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. या सुनावणीत जात पडताळणी समितीने काटे यांच्या जात प्रमाणपत्राची फेरपडताळणी करावी, दक्षता कमिटीमार्फत आवश्यक त्या कागपत्रांची छाननी आणि चौकशी करून अहवाल सादर करावा. असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. आदेश न्यायाधीश रियाज छागला व ए. एस. ओक यांच्या खंडपीठाने दिले आहेत. जात पडताळणीसंदर्भात न्यायालयीन निर्णयावरच त्यांचे महापौरपदाचे भवितव्य ठरवणार आहे. शत्रुघ्न काटे हे महापौरपदाचे दावेदार असून, त्यांच्यापुढे जात प्रमाणपत्रामुळे अडचण निर्माण झाली आहे. येत्या ३ जुलैला जात पडताळणी समितीला सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेशही दिले आहेत