आयुक्तालयात दोन परिमंडळ - आर. के. पद्मनाभन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 01:14 AM2018-08-12T01:14:47+5:302018-08-12T01:15:16+5:30
स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचे १५ आॅगस्टला उद्घाटन होणार असून, पोलीस आयुक्त आऱ के़ पद्मनाभन यांनी कामकाजाचे नियोजन केले आहे.
पिंपरी : स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचे १५ आॅगस्टला उद्घाटन होणार असून, पोलीस आयुक्त आऱ के़ पद्मनाभन यांनी कामकाजाचे नियोजन केले आहे. परिमंडल एक आणि दोन अशी दोन विभागात या पोलीस आयुक्तालयाची विभागणी केली जाणार असून, भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्य दिनी नव्या पोलीस आयुक्तालयाचा मुहूर्त गाठला जणार असून, सद्या त्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू असल्याचे पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी सांगितले.
चिंचवडगाव येथील प्रेमलोक पार्क परिसरातील इमारतीत नव्या पोलीस आयुक्तालयाचे कामकाज सुरू होणार आहे. या पोलीस आयुक्तालयांतर्गत येणारी पोलीस ठाणी, तसेच शहर परिसर याची पोलीस आयुक्त पद्मनाभन यानी माहिती घेतली. पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीतील मूलभूत सोयी-सुविधांच्या कामाचा आढावा घेतला. भौगोलिकदृष्ट्या विचार करता, आयुक्तालयाच्या कार्यकक्षेतील पोलीस ठाण्यांच्या हद्दीबाबत काही फेरबदल करता येतील का? या बाबत त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पोलीस उपायुक्त हे आणखी एक पद मंजूर करून घेण्याबाबतही विचारविनिमय सुरू आहे. आवश्यकता वाटल्यास तसा फेरबदलाचा प्रस्ताव शासनाच्या गृहखात्याकडे पाठविण्यात येईल.
परिमंडल दोन अंतर्गत सहायक पोलीस आयुक्त वाकड विभाग अखत्यारीत वाकड, हिंजवडी, सांगवी पोलीस ठाण्यांचा समावेश असेल. सहायक पोलीस आयुक्त चाकण विभागांतर्गत दिघी, चाकण, आळंदी आणि चिखली पोलीस ठाण्यांचा समावेश असेल. त्या दृष्टीने आयुक्त पद्मनाभन यांच्यामार्फत कामकाजाचे नियोजन केले जात आहे.
आणखी एक उपायुक्तपद
पोलीस उपायुक्त हे आणखी एक पद मंजूर करून घेण्याबाबतही विचारविनिमय सुरू आहे. परिमंडल एक आणि परिमंडल दोन असे विभाग असतील. त्यात खंडणीविरोधी पथक, संघटित गुन्हेगारीविरोधी पथक, महिला सुरक्षा विभाग, आर्थिक गुन्हे शाखा विभाग असे स्वतंत्र विभाग कार्यरत होणार आहेत. परिमंडल १ अंतर्गत सहायक पोलीस आयुक्त देहूरोड विभाग अखत्यारीत देहूरोड, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, निगडी पोलीस ठाण्याचा समावेश असेल, तर सहायक पोलीस आयुक्त पिंपरी विभागांतर्गत पिंपरी, चिंचवड,भोसरी आणि भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यांचा समावेश असेल.