जलवाहिनीचे काम होऊनही राडारोडा पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 03:03 AM2018-12-18T03:03:22+5:302018-12-18T03:03:37+5:30
दिघीतील समस्या : महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष, वाहनचालकांसह नागरिक त्रस्त
दिघी : परिसरातील आदर्शनगर सर्व्हे क्रमांक ७४ मध्ये वीस दिवसांपूर्वी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले होते. जेसीबीच्या साह्याने खोदकाम करून जलवाहिनी टाकण्याकरिता चर खोदण्याचे काम अगोदर करण्यात आले. परंतु ते होत असताना विद्युतपुरवठा खंडित होणे, गटारीच्या पाण्याची दुर्गंधी व नळजोड तोडल्याने पिण्याच्या पाण्यासाठीची वणवण अशा उद्भवलेल्या
समस्यांनी स्थानिकांची डोकेदुखी वाढली होती. लोकमत पाहणीतून ही बाब निदर्शनास आली. कधी एकदाचे काम संपणार व आपली सुटका होणार अशी बिकट अवस्था दिघीकरांची झाली होती. मात्र जलवाहिनीचे काम संपून आठवडा झाला, तरी आदर्शनगरमधील रस्त्यावर पडलेला राडारोडा तसाच असून, रस्ता बंद झाला आहे. आबालवृद्धांना अडचणींशी सामना करावा लागत असून, दिघीकरांचा मनस्ताप व वाढलेली डोकेदुखी संपली नसल्याचे वास्तव आहे.
जलवाहिनीचे काम संपून आठवडा झाला, तरी रस्त्यावरील राडारोडा, पडलेले खड्डे, उंच मातीचे ढिगारे तसेच आहेत. त्यामुळे स्थानिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लहान मुलांना खेळायला जागा शिल्लक नाही, तर दुचाकी लावायला जागा नसल्यामुळे त्या रस्त्यावर येत आहेत. ज्येष्ठांना चालण्याइतपतही रस्ता नीट नसून, दुचाकीस्वारांना कसरत करावी लागत आहे. काम झाल्यानंतर कंत्राटदाराने रस्त्यावर पडलेला राडा उचलणे आवश्यक होते; मात्र त्यांनी फिरूनही पाहिले नसल्याचे नागरिक सांगतात. प्रशासनसुद्धा वेळकाढूपणा करून सामान्यांना वेठीस धरीत आहे.
साहेब आले व गेलेसुद्धा!
दिघीतील पाणी समस्येवरून स्थानिक नगरसेवक व पाणीपुरवठा विभागाचे घमासान सुरू आहे. अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचे सूर हवेत विरले नाहीत, तोच लोकप्रतिनिधींनी दिघीतील गणेशनगर भागात पाहणी केली. त्यामुळे आदर्शनगर भागालाही भेट देऊन येथील समस्या संबंधित लोकप्रतिनिधी जाणून घेतील, अशी अपेक्षा स्थानिकांना होती़ मात्र तसे काही घडले नाही. साहेब आले व गेलेसुद्धा! वास्तविक आदर्शनगरमधील समस्या लोकप्रतिनिधींच्या कानावर गेल्या असल्याचे प्रत्यक्ष भेटायला गेलेल्यांनी सांगितले. शिवाय त्यांचा प्रतिनिधी सोबत येऊन बघून गेला व उद्या सर्व राडारोडा उचलायला लावतो म्हणून सांगून गेला, अशी माहिती नागरिकांनी दिली. मात्र अद्याप कोणीही आले नसल्याने नागरिकांनी खंत व्यक्त केली. आमच्याकडे लक्ष द्या, अशी साद आता आदर्शनगरवासीयांनी घातली आहे.
१जलवाहिनीचे काम सुरू झाल्यानंतर कंत्राटदारांच्या कामाच्या पद्धतीवर सर्वप्रथम नागरिकांनी आक्षेप घेतला होता. कारण यापूर्वी चोवीस तास पाणी योजना व भूमिगत केबलची कामे पूर्ण झाली होती. नागरिकांनी कामगारांना वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करीत जेसीबीच्या साह्याने खोदकाम सुरू ठेवले. त्यामुळे या झालेल्या कामांची वाट लागली.
२ मलनिस्सारण वाहिनीची तोडफोड झाली. घाण पाणी तुंबल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे रोज नवीन समस्या निर्माण होत गेल्या व त्याचा त्रास मात्र सामान्य जनतेला सहन करावा लागला होता. खोदकामात निघालेला राडारोडा लवकर उचलून रस्ता मोकळा करण्याची विनंती नागरिकांनी केली. मात्र त्यास कोणीही प्रतिसाद दिला नाही.