राहुल जाधव यांचा ‘स्थायी’चा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 01:25 AM2018-04-10T01:25:37+5:302018-04-10T01:25:37+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपात धुसफूस सुरू आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपात धुसफूस सुरू आहे. स्थायी समिती सभापतिपदात भोसरीला डावलल्याने महापौरांसह तिघांनी राजीनामा अस्त्र उपसले होते. पक्षश्रेष्ठींनी समजूत काढल्यानंतर बंडाळी थंडावली होती. आता महिनाभरानंतर भाजपा नगरसेवक राहुल जाधव यांचा स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा महापौर नितीन काळजे यांनी मंजूर केला आहे.
स्थायी समिती सदस्यपदी वर्णी लागल्यानंतर अध्यक्षपदाचे दावेदार असणाऱ्या आमदार महेश लांडगे गटाचे राहुल जाधव यांच्याऐवजी आमदार लक्ष्मण जगतापसमर्थक ममता गायकवाड यांची वर्णी
लागली. या स्थायी समिती सभापतिपदावरून भाजपामध्ये गटबाजी उफाळून आली होती. महापौर नितीन काळजे यांच्यासह राहुल जाधव, क्रीडा सभापती लक्ष्मण सस्ते यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे भाजपात फुट पडण्याची चर्चा होती.
दरम्यान, भाजपातील फुटीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने आमदार महेश लांडगे यांची नाराजी दूर केली. त्यानंतर आमदार लांडगे समर्थकांचे राजीनामा अस्त्र म्यान झाले होते. महापौर नितीन काळजे यांनी हे पुन्हा महापालिकेत सक्रीय झाले. स्थायी समितीच्या दोन बैठकाही झाल्या. मात्र, अचानकपणे राहुल जाधव यांचा राजीनामा महापौरांनी मंजूर केला.
महापौरांची मंजुरी
स्थायी समिती सभापती पदाच्या निवडीवरून आमदार लांडगे समर्थकांनी राजीनामा अस्त्र मागे घेतले होते. मात्र, त्यापैकी राहुल जाधव यांनी अचानकपणे स्थायी सदस्यपदाचा राजीनामा महापौर व पक्षनेत्यांकडे दिला. शिवाय महापौरांनी सोमवारी हा राजीनामा मंजूर केला. आमदार लांडगे गटाची समजूत काढूनही राहुल जाधव यांनी राजीनामा का दिला असावा. अन् महापौर यांनी तो तातडीने मंजूर केला. त्यामागे काहीतरी राजकीय डावपेच असण्याची चर्चा आहे.