हिंजवडीत दारुच्या अवैध विक्रीप्रकरणी चायनिज सेंटर, हाॅटेलवर छापा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 07:18 PM2020-12-19T19:18:33+5:302020-12-19T19:18:50+5:30
सव्वालाखाचा मुद्देमाल जप्त : सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई
पिंपरी : दारुच्या अवैध विक्रीप्रकरणी हिंजवडी येथील चायनिज सेंटर तसेच हाॅटेलवर छापा मारून एक लाख २७ हजार ९०६ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई केली.
योगेश राघु वाडेकर (वय ३२, रा. हिंजवडी) तसेच गणेश प्रभाकर गाणीग (वय ३२, रा. हिंजवडी), अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी वाडेकर हा स्वरा चायनिज अॅण्ड तंदूर पाॅईंट या चायनिज सेंटरचा चालक आहे. तर आरोपी गाणीग हा खुशबू कबाब करी अॅण्ड बिर्याणी रेस्टाॅरन्ट या हाॅटेलचा चालक आहे. आरोपी हे चायनिज सेंटर तसेच हाॅटेलमध्ये दारुची अवैध विक्री करीत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून रोकड, देशीविदेशी दारू तसेच बिअरच्या बाटल्या, असा एकूण एक लाख २७ हजार ९०६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
कल्याण मटक्यावर छापा
कल्याण मटका नावाच्या जुगारासाठी आरोपी शिवकुमार उर्फ बल्ली भाई पप्पू स्वामी मूरगन (वय ३५, रा. गांधीनगर झोपडपट्टी, देहूरोड) हा लोकांकडून पैसे घेऊन आकडे लिहून देऊन जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गांधीनगर झोपडपट्टी, देहूरोड येथे सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकला. त्यावेळी आरोपीकडे रोकड, मोबाईल, कल्याण मटक्याच्या चिठ्ठ्या, पेन , असे एकूण १५ हजार ५३० रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य मिळून आले. आरोपी मूरगन तसेच इतर तीन जणांविरुद्ध याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.