थेरगावला जुगार अड्ड्यावर छापा; भाजप नगरसेविकेच्या पतीवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 10:58 PM2021-03-10T22:58:14+5:302021-03-10T23:00:25+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पडवळनगर येथे राजस्थानी मारवाडी व्यक्तीच्या घरी जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी (दि. ७) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास छापा टाकला.
पिंपरी - घरात सुरू असलेल्या अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी जुगाराचा डाव उधळून लावला. याप्रकरणी भाजप नगरसेविकेच्या पतीसह आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पडवळनगर, थेरगाव येथे वाकड पोलिसांनी ही कारवाई केली.
मुरली ईश्वरदास येलवाणी (वय ६५, रा. काळेवाडी), विनोद यशवंत मिरगणे (वय ३८, रा. थेरगाव), शहाजी मधुकर पाटील (वय ४८, रा. वाकड), समीर अकबर अत्तार (वय ३६, रा. थेरगाव), प्रमोद प्रकाश पवार (रा. पडवळनगर, थेरगाव), बाळू जानराव (वय ३५, रा. वाल्हेकरवाडी), विनोद जाधव (वय ३०), राजस्थानी मारवाडी (पूर्ण नाव माहिती नाही, रा. पडवळनगर, थेरगाव), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. आरोपी प्रमोद पवार हे भाजप नगरसेविका मनीषा पवार यांचे पती आहेत. मनीषा पवार या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापती आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पडवळनगर येथे राजस्थानी मारवाडी व्यक्तीच्या घरी जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी (दि. ७) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी राजस्थानी मारवाडी व्यक्तीच्या घरात विनापरवाना, बेकायदेशीरपणे १३ पत्त्यांचा रम्मी नावाचा जुगार सुरू असल्याचे निदर्शनास आले. या छाप्यात एक हजार ७० रुपयांचे पत्त्यांचे कॅट, वही, तसेच ९०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.