पिंपरीत गुटखा विक्री, जुगार अड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा; ८९ हजारांचा मुददेमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 08:54 PM2021-02-16T20:54:59+5:302021-02-16T20:56:02+5:30
याप्रकरणी दोघांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पिंपरी : कल्याण मटका जुगार खेळणाऱ्या तसेच गुटखा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये ८९ हजार ५०२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी दोघांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील बाैध्दनगर येथे कल्याण मटका जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पाेलिसांनी सोमवारी (दि. १५) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत सहा हजार ५३५ रुपयांची रोकड, पाच हजार ५०० रुपये किमतीचे दोन मोबाईल, १० रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य, असा १२ हजार ४५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी मधुकर नाथा तुरुकमारे (वय ४७, रा. बाैध्दनगर, पिंपरी) याच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मासूळकर काॅलनी, पिंपरी येथे गुटखा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत ६७ हजार ५४७ रुपयांचा गुटखा, ९१० रुपयांची रोख रक्कम, नऊ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल, असा ७७ हजार ५४७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी जगदीश नगराज गोंडा (वय ३५, रा. मासूळकर काॅलनी, पिंपरी) याच्याविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहायक निरीक्षक नीलेश वाघमारे, उपनिरीक्षक धैर्यशील सोळंके, सहायक फाैजदार विजय कांबळे, पोलीस कर्मचारी अनंत यादव, संदीप गवारी, संतोष असवले, सुनील शिरसाट, नितीन लोंढे, संतोष बर्गे, मारुती करचुंडे, संगीता जाधव, सोनाली माने, भगवंता मुठे, वैष्णवी गावडे, मारोतराव जाधव, योगेश तिडके, योगिनी कचरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.