पिंपरीत गावठी दारूच्या हातभट्टीवर छापा; दोन महिलांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2022 05:13 PM2022-06-30T17:13:29+5:302022-06-30T17:13:44+5:30
गावठी दारुच्या हातभट्टीवर कारवाई करून तीन लाख रुपये किमतीचे तीन हजार लिटर कच्चे रसायन पोलिसांना मिळून आले
पिंपरी : गावठी दारुच्या हातभट्टीवर कारवाई करून तीन लाख रुपये किमतीचे तीन हजार लिटर कच्चे रसायन पोलिसांना मिळून आले. याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शिरगाव पोलिसांनी पवना नदीकाठी बुधवारी (दि. २९) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही कारवाई केली.
पोलीस नाईक नवनाथ बाळासाहेब धायगुडे यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. २९) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला शिरगाव पोलीस चौकीच्या हद्दीत पवना नदीकाठी हातभट्टीची दारू तयार करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शिरगाव पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. बेकायदेशीर कच्चे रसायन गुळमिश्रित लावून हातभट्टीची दारू तयार करीत असताना आरोपी महिला मिळून आल्या. तीन लाख रुपये किमतीचे तीन हजार लिटर कच्चे रसायन मिळून आले.