चिंचवडमधील डेअरीच्या कारखान्यावर छापा; तब्बल ५४६ किलो भेसळयुक्त पनीर जप्त
By नारायण बडगुजर | Published: May 12, 2023 12:35 PM2023-05-12T12:35:25+5:302023-05-12T12:35:42+5:30
भेसळयुक्त पनीर तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य मिळून एकूण चार लाख ६६ हजार ५२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
पिंपरी : चिंचवडमधील महाराष्ट्र मिल्क डेअरी या भेसळयुक्त पनीर तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा मारून कारवाई करण्यात आली. पोलिसांनी ५४६ किलो भेसळयुक्त पनीर तसेच पनीर बनविण्याचे इतर साहित्य जप्त केले. पिंपरी -चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली.
साजीद मुस्तफा शेख (वय ३२, रा. पडवळनगर, थेरगाव), जावेद मुस्तफा शेख (वय ३८), कामगार राकेश श्रीबुध्दराम सिंग (वय २६), अल्ताफ हजरतद्दीन शेख (वय २७), अभिषेककुमार योगेशबाबु यादव (वय २२), सर्फराज शराफतउल्ला शेख (वय ३५, रा. चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस हवालदार प्रदीप गोडांबे व पोलिस नाईक आशिष बोटके यांना मिळालेल्या माहितीवरून, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यासह चिंचवड येथे असलेल्या महाराष्ट्र मिल्क डेअरीवर छापा मारण्यात आला. यात भेसळयुक्त पनीर तयार करण्याकरीता वापरत असलेले १४ हजार रुपये किंमतीचे १४० लिटर ॲसेटीक ॲसीड, सहा हजार ३२० रुपये किंमतीचे ६० लिटर आरबीडी पामोलीन तेल, चार हजार ५०० रुपये किंमतीचे २५ किलो ग्लिसरील मोनो स्टीयरेट, तीन लाख ३२ हजार ५०० रुपये किंमतीची ८७५ किलो स्किम्ड मिल्क पावडर, एक लाख नऊ हजार २०० रुपये किंमतीचे ५४६ किलो भेसळयुक्त तयार पनीर असा एकूण चार लाख ६६ हजार ५२० रुपये किंमतीचा मुद्देमाल अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी यांनी जप्त केला.
खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार, सहायक निरीक्षक उध्दव खाडे, सहायक उपनिरीक्षक अशोक दुधवणे, पोलिस अंमलदार प्रदीप गोडांबे, विजय नलगे, चंद्रकांत जाधव, किरण काटकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.