दिघीत दारुची अवैधविक्री करणाऱ्या हाॅटेलवर छापा; तिघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 09:18 PM2020-12-26T21:18:05+5:302020-12-26T21:19:38+5:30
दीड लाखांचा मद्य साठा जप्त
पिंपरी : दारुची अवैध विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पाेलिसांनी हाॅटेलवर छापा टाकून एक लाख ५५ हजार ३५२ रुपयांचा देशीविदेशी दारु व बिअरच्या बाटल्या जप्त केल्या. दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्दारका गार्डन फॅमिली व्हेज - नाॅनव्हेज हाॅटेल येथे पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली.
शाम यशवंत तापकीर (वय ४५, रा. वडमुखवाडी, चऱ्होली), याच्यासह त्याच्या दोन साथीदारांविरोधांत दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे दारुची विनापरवाना अवैध विक्री करीत आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला. व्दारका गार्डन फॅमिली व्हेज - नाॅनव्हेज हाॅटेल, चऱ्होली बुद्रुक, वडमुखवाडी, दिघी, आळंदी येथून पाच लाख १२ हजार १९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात ७४ हजार ७४० रुपयांची रोकड, १२ हजार १०० रुपयांचे मोबाईल फोन, एक लाख ५५ हजार ३५२ रुपयांच्या देशी विदेशी दारुच्या व बिअरच्या बाटल्या, तसेच दोन लाख ७० हजार रुपये किमतीचे चारचाकी वाहन जप्त केले.
सामाजिक सुरक्षा पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहायक निरीक्षक निलेश वाघमारे, डाॅ. अशोक डोंगरे, उपनिरीक्षक धैर्यशिल सोळंके, सहायक फाैजदार विजय कांबळे, पोलीस कर्मचारी संतोष असवले, संदीप गवारी, अनिल महाजन, महेश बारकुले, विष्णू भारती, मारुती करचुंडे, मारोतराव जाधव, गणेश कारोटे, योगेश तिडके, वैष्णवी गावडे, सोनाली माने यांच्या पथकाने ही कारवाई केली.