पिंपरीत रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या रेस्टॉरंट अँड बारवर छापा; २१८ जणांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 12:25 PM2021-08-15T12:25:31+5:302021-08-15T12:39:34+5:30
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने रहाटणी येथील जगताप डेअरी चौकातील स्पॉट १८ येथे शनिवारी रात्री ही कारवाई केली.
पिंपरी : कोराना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांकडे दुर्लक्ष करून रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या दोन हॉटेलवर छापा टाकला. यात २१८ जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून रोकड व इतर साहित्य जप्त केले. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने रहाटणी येथील जगताप डेअरी चौकातील स्पॉट १८ येथे शनिवारी (दि. १४) रात्री ही कारवाई केली.
पहिल्या कारवाईत १८ डिग्रीज बार अँड लावूनचा मालक नीरज नेवाळे याच्यासह १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच १०५ ग्राहकांवर विनामास्क प्रकरणी कारवाई केली. त्यांच्याकडून ५२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरज नेवाळे आणि इतर आरोपींनी १८ डिग्रीज बार अँड लावून हा बार रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवला. त्यामुळे तेथे ग्राहकांची गर्दी झाली. कोररोना नियमांचे उल्लंघन झाले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. एक लाख ४०० रुपये रोख रक्कम जप्त केली.
दुसऱ्या कारवाईत योलो बार अँड रेस्टोचा मालक समीर वाघज याच्यासह नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच विनामास्क प्रकरणी ११३ जणांच्या विरोधात कारवाई करून त्यांच्याकडून ५६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. स्पॉट १८ येथील योलो बार अँड रेस्टो हे हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याची माहिती मिळाली त्यानुसार सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकून कारवाई केली. हॉटेल मालक समीर वाघज याच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून ७४ हजार २२० रुपये जप्त केले.
''रात्री दहापर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी आहे. असे असतानाही आरोपींनी रात्री साडेअकरा ते बारापर्यंत हॉटेल सुरू ठेवले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली. हॉटेल सील करून त्यांचा परवाना रद्द करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात येईल. असे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी सांगितले आहे.''