रेल्वे गेट ओलांडणे जोखमीचे
By admin | Published: May 5, 2017 02:33 AM2017-05-05T02:33:40+5:302017-05-05T02:33:40+5:30
नाणे रोडवर असलेले रेल्वे गेट आणि वडिवळे येथील संगिसे रेल्वे गेटचा अंतर्गत (रुळाजवळील) रस्ता अत्यंत खराब अवस्थेत
कामशेत : येथील नाणे रोडवर असलेले रेल्वे गेट आणि वडिवळे येथील संगिसे रेल्वे गेटचा अंतर्गत (रुळाजवळील) रस्ता अत्यंत खराब अवस्थेत आहे. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या अनेक दुचाकी व चारचाकी चालकांना त्रास होत आहे. या रस्त्यावरील ब्लॉक उखडले गेले असल्याने दुचाकी चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. एसटी बस व नाणे मावळात असणाऱ्या शाळांच्या बस या रस्त्यावर अडकून मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नाणे मावळात जाण्यासाठी कामशेतमधून नाणे रोड आहे. या रस्त्याच्या काही अंतरावर रेल्वे प्रशासनाचे गेट नं. ४३ - ए आहे. या गेटमध्ये रेल्वे रूळ रस्त्यावर रेल्वेकडून काही महिन्यांपूर्वी दुरुस्तीनिमित्त गेटवरील पेव्हर ब्लॉक खोदण्यात आले होते; परंतु काम झाल्यानंतर ते व्यवस्थित बसवण्यात आले नाहीत. रेल्वेच्या गाड्या जाऊन बसणाऱ्या हादऱ्यामुळे हे ब्लॉक एकमेकांपासून दूर जाऊन मोठे खड्डे तयार झाले आहेत. हे ब्लॉक जागोजागी उखडले असून अनेक ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अनेकदा या रस्त्यावर दुचाकीचालक कमी गती व खड्डा यामुळे पडत आहेत. मागून येणाऱ्या वाहनाचा त्यांना धक्का लागून अपघात होत आहे. हा रस्ता खराब असल्याने ठरावीक वेळी मोठी वाहतूककोंडी होत असून रेल्वे गेट बंद करण्याच्या वेळेपर्यंतही ती सुटत नाही.
हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा यासाठी छत्रपती नेटवर्क मावळ या युवकांच्या संघटनेने रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले असून, जर दुरुस्ती झाली नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. (वार्ताहर)
नाणे मावळात जाण्यासाठी दोन रेल्वे गेट ओलांडावे लागत असून येथे नाणे, कांब्रे, करंजगाव, गोवित्री, वळवती, वडवली, कोळवाडी, भाजगाव, सुमवडी, शिरदे, थोरण, जांभवली, साबळेवाडी, ब्राह्मणवाडी, कचरेवाडी, वाऊड, घोणशेत, कोंडीवडे, वळवंती, मोरमारवाडी, पाले, करंजगाव, उकसान, माऊ, साई, पारवडी, नाणोली, उंबरवाडी, वडीवळे, सांगिसे, बुधवडी, वळकं, खांडशी, नेसावे, आदी प्रमुख गावे व अनेक वाड्या-वस्त्यांमधील नागरिकांना रोज या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. पण, रेल्वेमार्ग ओलांडताना रस्त्याची दुरवस्था असल्याने अपघात होत आहेत.