रेल्वेचा तिसरा ट्रॅक, रेड झोन रद्द; नदीसुधार प्रकल्पाला सापडेना मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 02:51 AM2019-01-31T02:51:38+5:302019-01-31T02:51:52+5:30
पिंपरी-चिंचवड, मावळ, शिरूरमधील प्रलंबित प्रश्नांकडे होतेय दुर्लक्ष
पिंपरी : केंद्राचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहर, मावळ, शिरूर लोकसभा मतदारसंघांतील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. रेड झोनची हद्द कमी करणे, चाकण-निगडीपर्यंत मेट्रो, पुणे-लोणावळा लोहमार्गावर तिसरा आणि चौथा ट्रॅक उभारणे, पवना, इंद्रायणी, मुळा नदीसुधार, पर्यटन विकास, पुणे-नाशिक लोहमार्ग आदी प्रश्न प्रलंबित असून, त्यांना केंद्रीय अर्थसंकल्पात न्याय मिळणार का, असा प्रश्न आहे.
पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरी परिसराचा समावेश मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात होतो. या परिसरावर काँग्रेस, राष्टÑवादी आघाडी आणि भाजपा-शिवसेना युतीच्या कालखंडात अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. पुणे-लोणावळा लोहमार्ग आणि नाशिक-पुणे लोहमार्गाचे सर्वेक्षण झाले आहे. मात्र, त्यापुढील कार्यवाही झालेली नाही. लोणावळा-पुणे लोहमार्गावर दररोज लाखो रेल्वे प्रवासी प्रवास करतात. सध्या तासाला लोकल येतात. हा वेळ कमी करावा, अशी मागणी आहे. तसेच लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात, तसेच लोहमार्गावर तिसरा आणि चौथा ट्रॅक सुरू करावा, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. तसेच नाशिक-पुणे हा लोहमार्ग सुरू करावा, अशीही मागणी आहे. तसेच पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्या वाहतात. त्यांचा नदीसुधार, अंतर्गत विकास करावा, अशी मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. तसेच मावळ लोकसभा मतदारसंघात परिसरात कार्ला, माथेरान, लोणावळा खंडाळा, घारापुरी अशी अनेक पर्यटनस्थळे, पुरातन मंदिरे आहेत. लोणावळा परिसरात पावसाळी पर्यटनाची अनेक ठिकाणे आहेत. पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत पर्यटन स्थळांचा विकास करावा, अशी मागणी आहे. पिंपरी-चिंचवड शहरात तळवडे, देहूरोड-किवळे, भोसरी परिसरात लष्कराचा रेड झोन आहे. त्या रेड झोनच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली आहे. रेड झोनची मर्यादा कमी करावी, अशी मागणी होत आहे. पुणे मेट्रो ही पिंपरीपर्यंतच आली आहे. ती निगडीपर्यंत न्यावी, तसेच हिंजवडी ते चाकण आणि कासारवाडी ते चाकणपर्यंत मेट्रो नेण्यात यावी, अशी मागणी आहे. चिंचवड ते रोहा लोहमार्ग सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
मुंबईहून पुण्याला जाणाºया अनेक रेल्वे पिंपरी-चिंचवडला थांबत नाहीत. एक्सप्रेस रेल्वेचा थांबा शहरात असावा, तसेच चिंचवड येथे रेल्वे जंक्शन उभारण्यात यावे, ही मागणीही अनेक वर्षे पूर्ण झालेली नाही. केंद्राच्या अर्थसंकल्पात रेड झोनची हद्द कमी करणे, चाकण-निगडीपर्यंत मेट्रो, पुणे-लोणावळा लोहमार्गावर तिसरा आणि चौथा ट्रॅक उभारणे, नदीसुधार, पर्यटन विकास, पुणे-नाशिक लोहमार्ग आदी प्रश्न प्रलंबित असून, त्यांना केंद्रीय अर्थसंकल्पात न्याय मिळणार का, असा प्रश्न आहे.
नागरिक आणि शेतकºयांना दिलासा देणारा अर्थसंकल्प असणार आहे. लोहमार्ग रुंदीकरण, चिंचवड येथे रेल्वे जंक्शन, चाकण-निगडीपर्यंतच्या नव्या मेट्रोच्या नव्या मार्गांना परवानगी, पर्यटनविकास, पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीसुधार प्रकल्पाला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. - श्रीरंग बारणे, खासदार, मावळ
शेतकºयांच्या कांद्याला भावाचा प्रश्न आहे. तसेच नाशिक ते पुणे नवीन लोहमार्ग सर्वेक्षण झाले आहे. तसेच शंभर कोटींची तरतूद केली आहे. हा मार्ग लवकर सुरू व्हावा, तसेच शेतकरी, कामगार, कष्टकरी, नोकदार वर्गासाठी समाधानकारक बजेट असावे, अशी आम्हा सर्वांना अपेक्षा आहे.
- शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार, शिरूर
प्रलंबित प्रश्न-
पवना, मुळा, इंद्रायणी नदी सुधार, पुणे-लोणावळा रेल्वेमार्ग रुंदीकरण, निगडीपर्यंत मेट्रो