धोऽऽ धो बरसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 01:01 AM2017-09-09T01:01:53+5:302017-09-09T01:01:53+5:30
शहर व परिसरात शुक्रवारी पहाटे आणि सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहर व परिसरात शुक्रवारी पहाटे आणि सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळी झालेल्या पावसाने रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले. त्यामुळे अनेक वाहने पाण्यात गेली.
पूर्वा नक्षत्रात पडलेल्या पावसाने शहर व परिसर झोडपून काढला असून, सकाळी २२.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. दुपारी कडक ऊन पडल्यानंतर आकाशात ढगांची गर्दी झाली होती आणि सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास धो धो पाऊस बरसला. यामुळे सायंकाळी जनजीवनावर परिणाम झाला. अनेक रस्त्यांवर वाहतूक खोळंबलेली दिसली. या पावसाची ५ मि.मी. नोंद झाली आहे. जोरदार पावसामुळे सखल भागात पाण्याचे तळे निर्माण झाले होते.
गुलमंडी, समर्थनगर, औरंगपुरा, समतानगर, क्रांतीचौक, कॅनॉट प्लेस, हडको, सेंट्रलनाका, बीड बायपास, जालना रोड आदी ठिकाणी रस्त्यांवरून पुराचे पाणी वाहत असल्यासारखे चित्र होते. शहरातील विविध रस्त्यांच्या बाजूला असलेल्या गटारीच गायब झाल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा न होता. ते पाणी रस्त्यावरून वाहत होते. पावसाच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यातच अनेक रस्त्यांवर दिवे नसल्याने वाहनचालकांना रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे वाहतूक मंद झालेली दिसली. अनेक वाहनेदेखील खड्ड्यात आदळून किरकोळ अपघाताचे प्रकार घडले.
सकाळी झालेल्या पावसामुळे विद्यार्थी, अधिकारी, कर्मचाºयांची गैरसोय झाली. पुन्हा सायंकाळीही पावसातच घर गाठावे लागले. नुकतेच मुरूम, खडी टाकून मनपाने बुजविलेले खड्डे धो धो पावसाने धुऊन गेले.