Rain Updates: पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीकाठच्या भागात रेड अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 12:49 IST2023-07-22T12:49:13+5:302023-07-22T12:49:21+5:30
पिंपरी-चिंचवड शहर परिसरातून तीन नद्या वाहतात...

Rain Updates: पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीकाठच्या भागात रेड अलर्ट
पिंपरी : गेल्या पाच दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. हवामान खात्याने मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुळशी आणि मावळ परिसरातही पावसाने जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे. तर आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. अग्निशमन यंत्रणा सज्ज असून अग्निशमनची टीम बचाव कार्यासाठी सज्ज आहे.
पिंपरी-चिंचवड शहर परिसरातून तीन नद्या वाहतात. पावसामुळे विविध प्रवाहातून थेट नदीपात्रात येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यास आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते, या पार्श्वभूमीवर कोणतीही जीवित अथवा वित्त हानी होऊ नये, यासाठी महापालिकेच्या सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे, असे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. तसेच आढावा बैठकही घेतली आहे.
पावसाचे खड्डे बुजवा
पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर पाणी तुंबणार नाही याची दक्षता महापालिका प्रशासनाने घ्यावी, रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, प्रभागनिहाय बीट निरीक्षक, अभियंते आणि संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी पेट्रोलिंग करून पाहणी करावी, अशी बाब आढळून आल्यास तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
झोपडपट्ट्यांसाठी पथक नियुक्त
शहरातील ज्या भागात पूरसदृश परिस्थिती उद्भवते. अशा ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नदीकाठी असणाऱ्या शहरातील वस्त्यांमध्ये पथक बारकाईने लक्ष ठेवून आहे.
चोवीस तास पूर नियंत्रण कक्ष
नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने सर्व अग्निशमन केंद्रांच्या ठिकाणी पूर नियंत्रण कक्ष सुरु आहे. शिवाय महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष असून सर्व कक्ष चोवीस तास कार्यान्वित ठेवला आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.
-चंद्रकांत इंदलकर (आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सह आयुक्त)