पावसाचे पाणी दारात; नागरिकांचा जीव मेटाकुटीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:12 AM2018-08-28T00:12:53+5:302018-08-28T00:13:31+5:30
येथील मुंबई-पुणे महामार्गाच्या पलीकडे असलेल्या इंद्रायणी कॉलनीला मागील अनेक वर्षांपासून विविध समस्यांनी ग्रासले आहे. त्यातील महत्त्वाची समस्या म्हणजे डोंगरउताराने येणारे पावसाचे पाणी कॉलनीतील
कामशेत : येथील मुंबई-पुणे महामार्गाच्या पलीकडे असलेल्या इंद्रायणी कॉलनीला मागील अनेक वर्षांपासून विविध समस्यांनी ग्रासले आहे. त्यातील महत्त्वाची समस्या म्हणजे डोंगरउताराने येणारे पावसाचे पाणी कॉलनीतील अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचत आहे. या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणती उपाययोजना नसल्याने हे पाणी अनेक घरांमध्ये शिरत आहे. तर काही घरांमध्ये झिरपत आहे. तसेच सांडपाण्याच्या समस्येने स्थानिक मेटाकुटीला आले आहेत.
मुंबई -पुणे महामार्गाच्या पलीकडे असलेल्या इंद्रायणी कॉलनीत सांडपाण्याची समस्या गंभीर असून, सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य सोय नसल्याने गटारांमध्येच सांडपाणी तुंबून परिसरात कायम दुर्गंधी पसरलेली असते. या सांडपाण्यावर डासांची पैदास वाढली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. येथील काही घरांमध्ये गटारीचे तुंबलेल्या सांडपाण्याचा झिरपा होऊन ते पाणी नागरिकांच्या घरात निघत आहे. त्यातच दर वर्षी पावसाळ्यात डोंगराचे वाहणारे पाणी मोठ्या प्रमाणात या भागात येत असून, या पाण्याला पुढे जाण्यासाठी मार्ग नसल्याने त्याचा निचरा होत नाही व येथे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबते. दोन ते तीन फूट पाणी रस्त्यावर साचल्याने रस्ता बंद होतो. चारचाकी, दुचाकी वाहने पाण्यात अडकतात. परिसरातील काही नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याचे प्रकार तर दर वर्षी होतात. अनेकदा रात्री उशिरा घरात पाणी शिरून बिछाना भिजत आहे. तर अनेक वस्तूंचे नुकसान होत आहे. घरातील मौल्यवान सामानाची नासधूस होत असल्याने येथील लोक त्रस्त झाले आहेत. घरात आलेले पाणी बाहेर काढण्यासाठी रात्र जागवण्याची वेळ अनेकांवर येत असल्याचे राजू अगरवाल यांनी सांगितले. पवनानगर फाटा येथे होणाऱ्या उड्डाणपुलाच्या सांडपाण्याच्या गटारीत हे पाणी जाऊन या वर्षी तरी ही समस्या सुटेल, अशी सर्वांची आशा होती. प्रत्यक्षात पाण्याच्या निचºयासाठी ठोस उपाययोजना झाली नाही.