पिंपरीतील भाजीमंडईत पावसाच्या पाण्याची गळती, विक्रेत्यांसह ग्राहकांना सहन करावा लागतोय त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 03:51 PM2021-05-17T15:51:31+5:302021-05-17T15:59:37+5:30
विकेंड लॉकडाऊननंतर ग्राहकांनी मोठ्या संख्येने खरेदीसाठी भाजी मंडईत केली गर्दी
पिंपरी: महापालिकेने जाहीर केलेल्या संचारबंदीच्या नियमानुसार सकाळी ११ पर्यंतच भाजीपाला, किराणा माल यांना खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना भाजी खरेदीसाठी जास्त वेळ मिळत नाही. त्यातून विकेंड लॉकडाऊननंतर ग्राहक मोठ्या संख्येने खरेदीसाठी भाजी मंडईत गर्दी करतात. मात्र सोमवारी झालेल्या पावसामुळे भाजी मंडईत गळती झाली. त्यामुळे ग्राहक तसेच विक्रेत्यांनाही गैरसोयीचा सामना करावा लागला.
पिंपरी येथे रेल्वेस्टेशनला लागून असलेल्या इंदिरा गांधी उड्डाणपुलाजवळ महापालिकेच्या इमारतीच्या तळमजल्यावर भाजी मंडई आहे. दोन इमारतींमध्ये असलेल्या भागातून पावसाच्या पाण्याची मंडईत गळती होते. गेल्या काही वर्षांपासून ही समस्या आहे. याबाबत विक्रेत्यांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली आहे. तसेच उपाययोजना करून दुरुस्तीची मागणी केली आहे. असे असतानाही प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी दरवर्षी पावसाळ्यात येथे ही समस्या असते. गळतीमुळे मंडईत सर्वत्र पाणीच पाणी होते.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. सुरक्षित राहून मास्क, सॅनिटायजरचा वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. असे असताना मंडईत पाणी साचून दुर्गंधी तसेच डासांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यासाठी वेळीच उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
विकेंड लॉकडाऊन संपल्यानंतर सोमवारी ग्राहक मोठ्या संख्येने भाजी मंडईत येतात. मात्र पावसामुळे ग्राहकांची संख्या कमी असतानाही गळतीमुळे त्यांना त्रास सहन करावा लागला. गळती थांबवण्यासाठी दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.