पिंपरी-चिंचवड | चार दिवसांत पावसाने गेल्यावर्षीची सरासरी ओलांडली, चारशे मिलीमीटर जादा पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 01:33 PM2022-07-13T13:33:32+5:302022-07-13T13:35:01+5:30
धरण क्षेत्रात साडेतीनशे मिलीमीटर पाऊस...
पिंपरी : यंदा पावसाळा उशिरा सुरू झाला असला तरी धो-धो पाऊस पडत आहे. मावळ परिसरात पावसाचा जोर सुरू झाला आहे. चार दिवसांत पावसाने गेल्यावर्षीपेक्षा सरासरी ओलांडली आहे. चारशे मिलीमीटर अधिक पाऊस पडला असून सोळा टक्क्यांवर आलेले पवना धरण वीस टक्के भरले आहे.
पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीस पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणातून नदीत आणि रावेत येथील जलउपसा केंद्रातून प्राधिकरणातील जलशुद्धिकरण केंद्रात पाणी आणले जाते. तेथून शहरात उभारण्यात आलेल्या टाक्यांमध्ये पाणी सोडले जाते. तेथून जलवाहिन्यांच्या माध्यमातून शहरातील उपनगरांमध्ये पाणीपुरवठा केला जातो. यंदा चार जुलैपर्यंत पाऊस येण्याचे चिन्ह नव्हते. त्यामुळे पाणीकपातीचे संकट शहरवासीयांवर ओढवणार असल्याचे दिसून येत होते.
मात्र, पाच जुलैपासून पावसाचे वातावरण सुरू झाले. पावसाला सुरुवात झाली. तीन दिवसांत साडेतीनशे मिलीमीटर पाऊस पडला आहे. पवना धरण परिसरात चोवीस तासांत १३६ मिलीमीटर पाऊस पडला आहे. तर वीस टक्क्यांनी धरणसाठ्यात वाढ झाली आहे.
पाणीकपात केली रद्द
दिवसाआड पाणीपुरवठाच कायम ठेवून ज्या भागात चार तास, तीन तास पाणीपुरवठा होता त्या भागात तीन आणि दोन तास पाणी पुरवठयाचे तसेच एक तास पाणीपुरवठा असणाऱ्या भागात बदल केला जाणार नाही. पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे महापालिकेने प्रस्तावित केलेली कपात रद्द केली आहे.
धरण क्षेत्रात साडेतीनशे मिलीमीटर पाऊस
गेल्या वर्षी पवना धरण परिसरात आजअखेरपर्यंत ५७४ मिलीमीटर पाऊस पडला होता. तर पाऊस सुरू झाल्याने आजपर्यंत ९०३ मिलीमीटर पाऊस पडला आहे. तर आज सकाळपासून सायंकाळी सहापर्यंत १३६ मिलीमीटर पाऊस पडला आहे. धरण क्षेत्रात चार दिवसांत साडेतीनशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी धरणात ३२ टक्के पाणी होते. यंदा ३६.४९ टक्के पाणीसाठा आहे.
धरण क्षेत्रात पाऊस सुरू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. चोवीस तासांत १३६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर आजअखेर धरणाचा पाणीसाठा २० टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाऊस वाढला आहे.
-अशोक शेटे (पवना धरण)