उद्योगनगरीत वादळासह पावसाची हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2019 07:29 PM2019-06-09T19:29:53+5:302019-06-09T19:30:45+5:30
पिंपरी चिंचवडमध्ये वादळीवाऱ्यासह पावसाने जाेरदार हजेरी लावली. यात काही जाहीरातीच्या फरकांचे नुकसान झाले तर काही ठिकाणी झाडाच्या फांद्या देखील काेसळल्या.
पिंपरी : उद्योगनरीत रविववारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शहरवासी सुखावले असून, वातावरणात गारवा झाल्याने उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान काही ठिकाणी जाहिरात फलकांचे नुकसान झाले असून झाडांच्या फांद्या पडल्या. तसेच वाहनचालक आणि पादचाऱ्यांची तारांबळ उडाली होती.
पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. मात्र त्यावेळी केवळ शिडकावा केल्यासारखा पाऊस झाला. उकाड्यापासून तात्पुरता दिलासा मिळाला. मात्र शनिवारी आणि सलग रविवारीही मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता. रविवारी दुपारनंतर वातावरणात बदल होण्यास सुरुवात झाली. सायंकाळी आकाशात ढग जमा झाले होते. काळ्या ढगांमुळे पावसाचे वातावरण झाले होते. पावणेसहाच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वारा सुरु झाला. त्यामुळे पादचारी आणि वाहनचालकांची कसरत झाली. सहाच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. खरेदीला बाहेर पडलेल्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली.
रविवारी सुटीचा दिवस असल्याने शहरातील चाकरमाने मोठ्या संख्येने रविवारी सायंकाळी खरेदीसाठी बाहेर पडले होते. पिंपरीतील शगुन चौक आणि मुख्य बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. अचानक वादळी पाऊन आल्याने या चाकरमान्यांची आणि बाजारपेठेतील पथारीवाले, हातगाडीवाले आणि व्यावसायिकांची तारांबळ झाली. उघड्यावरील विक्रीच्या साहित्याची आवराआवर करताना त्यांची धांदल उडाली. त्याचप्रमाणे चिंचवडगावातील चापेकर चौक, मंडई परिसरात, निगडी, चिखलीतील कृष्णानगर चौकातील मंडई परिसर, भोसरी येथील उड्डाणुलाखालील मुख्य चौक व परिसरात विक्रेत्यांची कसरत झाली.
चिमुकल्यांनी लुटला आनंद
शाळांना सुटी असल्याने तसेच रविवारी सुटी असल्याने अनेक पालक आपल्या चिमुकल्यांसह शहरातील उद्यांनामध्ये विरंगुळ्यासाठी आले होते. मात्र अचानक वादळी पावसामुळे त्यांची धांदल उडाली. असे असले तरी लहान मुलांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला. निगडीतील भक्ती-शक्ती उद्यानालगतच्या व्यावसायिकांची त्रेधातिरपीट झाली.
विजांचा कडकडाट
रविवारी सायंकाळी आकाशात अचानक ढग दाटून आले. पावसाच्या आगमनावेळी ढगांचा गडगडाट झाला. तसेच विजांचाही कडकडाट होत होता. सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस सुरू होता.