पावसामुळे भात उत्पादनात १० टक्के वाढ, हेक्टरी ४० ते ४५ क्विंटलचे उत्पन्न, ९५ टक्के भात कापण्या पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 01:49 AM2017-11-22T01:49:38+5:302017-11-22T01:49:43+5:30
कामशेत : भातपिकाचे आगर समजल्या जाणा-या मावळ तालुक्यातील खरिपातील भातपिकाच्या कापण्या ९५ टक्के पूर्ण झाल्या आहेत.
कामशेत : भातपिकाचे आगर समजल्या जाणा-या मावळ तालुक्यातील खरिपातील भातपिकाच्या कापण्या ९५ टक्के पूर्ण झाल्या आहेत. या वर्षी मुबलक व समाधानकारक, तसेच भात पिकाला पूरक पाऊस पडला असल्याने पिकाची जोमात वाढ झाली होती. गतवर्षीपेक्षा मावळातील शेतकºयांना भाताचे सुमारे दहा टक्के जास्त उत्पादन अधिक मिळणार असल्याचा कृषी अधिकाºयांचा अंदाज आहे.
मावळ तालुक्यात भात पिकाचे उत्पादन घेणाºया शेतकºयांची संख्या मोठी आहे. येथील पर्जन्यमान भात पिकास पोषक असल्याने, तसेच या वर्षीच्या पावसाने योग्य वेळी व संततधार हजेरी लावल्याने भातपिकाचे उत्पादन उत्तम झाले, असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी विनायक कोथंबिरे यांनी दिली. या वर्षी पावसाने सुरुवातीला काही प्रमाणात ओढ देऊन उशिराने सुरुवात केली. मात्र, नंतर मुबलक पडलेल्या पावसामुळे भात पिकाच्या उत्पादनात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. काही ठिकाणी परतीच्या पावसाने उभ्या भात पिकाला दणका बसला होता. जुलै महिन्यापासून वेळोवेळी पावसाने दमदार हजेरी लावल्याने भातपीक तरारून उभे राहिले. वाढीच्या काळात अवकाळी पावसामुळे भातपिकांचे नुकसान झाले होते. खाचरांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने अनेक भागात शेतकºयांना भातकापणी करणे अवघड झाले होते. कापणी करून सर्व भात कोरड्या जागेत ठेवावे लागत होते. सुमारे तीन आठवड्यांपूर्वी भातकापणीला सुरुवात झाली.
शेतमजुरांचा तुटवडा
एकाच वेळी अनेकांची भात कापणी आल्याने शेतमजुरांचा मोठा तुटवडा जाणवला. या दिवसांत शेतमजुरांची बडदास्त राखण्यात अनेक भातपीक उत्पादक शेतकरी गुंतले होते. तर अनेकांनी घरातील मंडळींच्या साहाय्याने भात कापणी उरकली.
>तालुक्यात सुमारे ९७०० हेक्टर क्षेत्र भात पिकाचे असून, या वर्षी सुमारे १२ हजार हेक्टर क्षेत्रात भात पिकाची लागवड करण्यात आली होती. मागील वर्षीचे भात पिकाचे उत्पादन प्रति हेक्टर ३६ क्विंटल झाले होते. या वर्षी सुमारे ४० ते ४५ क्विंटल भातपिकाचे प्रति हेक्टर उत्पादन झाले.
- विनायक कोथंबिरे, तालुका कृषी अधिकारी, मावळ