पावसाळापूर्व नालेसफाई एप्रिलअखेर - महापालिका प्रशासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 03:24 AM2018-04-17T03:24:27+5:302018-04-17T03:24:27+5:30
शहरातील विविध नाल्यांची सफाई वेळेत होत नसल्याने पावसाळ्यात झोपड्या व घरांत पाणी घुसण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे शहरातील नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या लोकसहभागातून व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मार्चपासूनच नालेसफाईला सुरुवात केली आहे.
पिंपरी : शहरातील विविध नाल्यांची सफाई वेळेत होत नसल्याने पावसाळ्यात झोपड्या व घरांत पाणी घुसण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे शहरातील नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या लोकसहभागातून व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मार्चपासूनच नालेसफाईला सुरुवात केली आहे. पावसाळापूर्व नालेसफाईचे काम एप्रिलअखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड शहरातील नालेच्या परिसरात पावसाळ्यात पाणी रस्त्यांवर येते. नदी-नाला परिसरातील वसाहती, झोपड्या व घरांमध्ये पाणी घुसल्यानंतर ऐनवेळी प्रशासनाला धावपळ करावी लागते. अनेकदा झोपड्यांमध्ये पाणी शिरून संसारोपयोगी वस्तू वाहून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने या वर्षी लवकरच नालेसफाईचे काम हाती घेतले आहे. या कामात अनेक खासगी व स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक वार्डामध्ये लोकसहभागातून नालेसफाई केली जाणार आहे.
सांडपाणी प्रक्रियेवर भर
शहरात काही ठिकाणी नाल्यांमध्ये थेट सांडपाणी सोडले जाते. त्यामध्ये कचरा, प्लॅस्टिक पिशव्या व इतर राडारोडा गेल्याने नाले तुंबतात. त्यासाठी वाहत येणाऱ्या सांडपाण्याचा शोध घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. सांडपाणी प्रक्रिया वाढवण्यावर भर दिला आहे. सध्या २२० एमएलडीवर होणारी सांडपाणी प्रक्रिया २५० एमएलडीपर्यंत वाढविण्यात आली आहे. ३० एमएलडी सांडपाणी प्रक्रिया वाढविली आहे. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीही केली जाणार आहे. नाल्यांचे सर्वेक्षण करुन प्रत्येक नाल्याची सफाई करण्यावर भर दिला जाणार आहे, असे हर्डीकर यांनी सांगितले.
प्लॅस्टिक संकलन मोहीम
शासनाने प्लॅस्टिक व थर्माकॉलवर बंदी घातली आहे. त्यामुळे महापालिकेने १९ ते २१ या कालावधीत प्लॅस्टिक संकलन मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्था व प्लॅस्टिक असोसिएशनचीही मदत घेण्यात येणार आहे. प्रभागनिहाय ती राबविण्यात येणार
आहे. त्यासाठी विविध ठिकाणी प्लॅस्टिक संकलन केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
‘‘शहरातील नदी-नाले यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी सांडपाणी प्रक्रियेवर भर दिला आहे. पावसाळ््यात ऐनवेळी धावपळ नको म्हणून मार्चपासूनच नालेसफाई हाती घेतली आहे. एप्रिलअखेर पावसाळापूर्व नालेसफाईचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.’’
- श्रावण हर्डीकर,
आयुक्त, महापालिका