राज ठाकरेंचा मनमिळाऊपणा; आजाराने त्रस्त राजची इच्छा राज ठाकरे यांनी केली पूर्ण
By विश्वास मोरे | Published: August 23, 2023 07:34 PM2023-08-23T19:34:36+5:302023-08-23T19:35:03+5:30
पिंपरीतील रिक्षाचालकाचा मुलगा मस्कुलर डिसट्रॉपी या आजाराने त्रस्त असून त्याला राज ठाकरे यांना भेटण्याची तीव्र इच्छा होती
पिंपरी : मस्कुलर डिसट्रॉपी या आजाराने त्रस्त असलेल्या रिक्षा चालकांच्या राज या मुलास मनसे प्रमुख राज ठाकरे यांना भेटण्याची इच्छा होती. ही माहिती राज ठाकरे यांना मिळताच त्यांनी बुधवारी दुपारी राजची दापोडीतील निवासस्थानी भेट घेतली. खेळणी, खाऊ दिला. एका राजचा हट्ट दुसऱ्या राजने पूर्ण केला.
दापोडीत वास्तव्यास असलेले विशाल देशपांडे हे मनसेचे कार्यकर्ते आहेत. कंपनीतील नोकरीनंतर ते आता रिक्षा चालवतात. देशपांडे यांना राज नावाचा मुलगा आहे. तीन महिन्यांपूर्वी या मुलाला मस्कूलर डिसट्रॉपी या आजाराचे निदान झाले. मुलाची राज ठाकरे यांना भेटण्याची तीव्र इच्छा होती. त्याने वडिलांकडे तसा हट्ट धरला. त्यानंतर ही गोष्ट सोमवारी ठाकरे यांना कळाली. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी ठाकरे हे विशाल यांच्या घरी पोहोचले. मुलासाठी स्वत: खरेदी करुन खेळणी आणली. त्याच्यासाठी खाऊ आणला. त्याच्यासोबत १५ ते २० मिनिटे गप्पा मारल्या. मुलाने पांढरा झब्बा घातला होता. त्यावर राज ठाकरे यांनी प्रिय राज असे लिहित स्वाक्षरी केली. ठाकरे यांनी घरी भेट देत इच्छा पूर्ण केल्याने देशपांडे कुटुंबीयांना आनंद झाला.