पुनावळेतील कचरा डेपोस विरोध; नागरिकांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
By विश्वास मोरे | Published: October 29, 2023 03:53 PM2023-10-29T15:53:21+5:302023-10-29T15:54:15+5:30
पुनावळे काटे वस्ती जंगलातील २२ हेक्टर परिसरात पसरलेली लाखो झाडे कचरा डेपोसाठी तेडली जातील आणि पाणी, माती आणि हवेच्या प्रदुषणामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होईल
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेने पुनावळे येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणीचा निर्णय घेतला आहे. त्यास विरोध करण्यासाठी नागरीक आक्रमक झाले आहेत. त्यांनी मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. पिंपरी चिंचवड महापालिकेने पुनावळे येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणी संदर्भात निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुनावळे येथील रहिवासी चिंतेत आहोत. निर्णयाबद्दल विरोध करण्यासाठी सर्व नागरीकांनी ठाकरे यांची भेट घेतली.
महापालिका घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प डिसेंबर २०२३ पर्यंत सुरु करण्यास उत्सुक आहेत. पुनावळे काटे वस्ती जंगलातील २२ हेक्टर परिसरात पसरलेली लाखो झाडे कचरा डेपोसाठी तेडली जातील आणि पाणी, माती आणि हवेच्या प्रदुषणामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होईल. पुनावळे, हिंजवडी, मारुंजीमधील ग्रामस्थ आणि मनसे सरचिटणीस रणजित शिरोळे, गणेश सातपुते, शहर प्रमुख सचिन चिखले, उपशहरअध्यक्ष राजु सावळे, उपविभाग अध्यक्ष विशाल साळुखे, मारुजी शहरअध्यक्ष सतोष कवडे या उपस्थित होते.
का आहे विरोध
१) घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प जेव्हा २००८ मध्ये मंजूर केला गेला. त्यावेळी एवढ्या प्रमाणात नागरीकरण नव्हते. परंतु आता मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प, शैक्षणिक संस्था, रुग्णालये येथे उभारले गेले आहेत. प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे या सगळ्या गोष्टीवर गंभीर परिणाम होऊ शकतो .
२) पुनावळे परीसरात मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेले असून ते अजूनही सुरूच आहे. सुमारे १ लाखाहून अधिक नागरिक सध्या पुनावळे येथे राहत आहेत. नैसर्गिक वातावरण, शेजारी असलेले हिंजवडी आयटी पार्क आहे. मात्र, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा काही गृह प्रकल्पापासून केवळ दोनशे तीनशे मीटर अंतरावर आहे .
३) नैसर्गिकरित्या लाभलेल सौंदर्य नष्ट होईल कारण प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा जंगलाच्या अगदी कडेला लागून उभारण्याचा विचार करण्यात आलेला आहे.
४) प्रकल्प हा पश्चिम दिशेला आहे. वारे नेहमी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात आणि म्हणून याचा परिणाम पुनावळेसोबतच वाकड , ताथवडे , हिंजवडी आय टी पार्क , मारुंजी, मुंबई पुणे महामार्गासारख्या आधीच विकसित असलेल्या परिसरात देखील होण्याची दाट शक्यता आहे.