शक्ती जगाला घाबरविण्यासाठी नव्हे, जगद्कल्याणासाठी हवी- राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 05:24 PM2022-05-20T17:24:15+5:302022-05-20T18:37:34+5:30

पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ पुणे यांच्या १३ व्या पदवीदान समारंभात राजनाथ सिंह बोलत होते...

rajnath singh said power should be motivated by the spirit of world welfare not to frighten the world | शक्ती जगाला घाबरविण्यासाठी नव्हे, जगद्कल्याणासाठी हवी- राजनाथ सिंह

शक्ती जगाला घाबरविण्यासाठी नव्हे, जगद्कल्याणासाठी हवी- राजनाथ सिंह

Next

पिंपरी : जीवनात ज्ञानास जेवढे महत्व आहे, तेवढेच संस्कारांना आहे. जीवनमुल्यांशी आपण नेहमी कटीबद्ध असायला हवे. आपली जीवनमुल्ये व्यक्तीमत्व घडवित असतात. शिक्षण, अध्यात्म, संस्कारच देशाला पुढे नेतील. भारताला जगदगुरूंचे स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. ज्ञान, धन संपत्तीबरोबरच व्यक्तीमत्व विकासाकडे लक्ष घ्यायला हवे. त्यातूनच शक्तीवान, ज्ञानवान, धनवान बनू शकणार आहोत, आपली शक्ती  जगाला घाबरविण्यासाठी नव्हे, जगद्कल्याण भावनेने प्रेरीत असायला हवी, असे मत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पिंपरी येथे शुक्रवारी व्यक्त केले.

तरूणांची जाणीव समृद्ध
ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्म यांचे जीवन घडविण्यासाठी असणारे महत्व, मनसंस्कार, मनस्वास्थ यावर मार्गदर्शन करताना महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे दाखले देऊन तरूणांची जाणीव समृद्ध केली. ज्ञान आणि तत्वज्ञानाचे दाखले आणि किस्से सांगितले. त्यास टाळ्यांचा कडकडाट देऊन तरूणाईने दाद दिली.

राजकारणात असतानाही संतुलन ठेवले पाहिजे
जीवनात शिक्षण, ज्ञान, संस्कार महत्वाचे आहे. शिक्षणाचा परिणाम व्यक्तिमत्त्व घडण्यास होत असतो. ओसामा बिन लादेन अरबपती, खरबपती होता. मात्र, त्याने ज्ञानाचा दुरुपयोग केला. दुसरीकडे पेपर विक्रेता असणारे ए.पी.जे अब्दुल कलाम हे शास्त्रज्ञ झाले, पुढे देशाचे राष्ट्रपती झाले. देशाला विकास पथावर नेण्यास योगदान दिले. दोन व्यक्तींचा विचार केल्यास शिक्षण आणि संस्कार याचा हा परिणाम आहे, राजकारणात असतानाही संतुलन ठेवले पाहिजे. ते अध्यात्माने येते, असेही राजनाथ सिंह म्हणाले.

स्वदेशी २ ची हाक
राजनाथसिंह म्हणाले, ‘‘ स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने आत्मनिर्भर होण्याचा संकल्प केला आहे. आपल्या गरजांसाठी दुसऱ्या देशांवर भारत आता अवलंबून राहू इच्छित नाही. त्यासाठी 'व्होकल फॉर लोकल'ची हाक पंतप्रधानांनी दिली आहे. स्वदेशी-२ हा त्याच योजनेचा भाग आहे. स्वदेशीची पहिली हाक याच पुण्यातून लोकमान्य टिळक व महात्मा गांधी यांनी दिली होती. विद्यार्थ्यांनी व्यवसाय-उद्योगात नव्या संकल्पना आणण्यावर भर द्यावा.’’

पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ पुणे यांच्या १३ व्या पदवीदान समारंभात संरक्षण मंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर यावेळी डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती  डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री  पाटील, कुलगुरू  डॉ. एन. जे. पवार, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त व संचालिका डॉ. स्मिता जाधव  विश्वस्त व कोषाध्यक्ष  डॉ. यशराज पाटील उपस्थित होते.

यावेळी प्रसिद्ध उद्योगपती व फोर्स मोटर्सचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया, उद्योजक प्रतापराव पवार यांना डी.लिट आणि दत्ता मेघे इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूरचे  प्र-कुलपती  डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांना डॉक्टर आॅफ सायन्स (डी.एससी) ही मानद पदवी देऊन गौरविले.

Web Title: rajnath singh said power should be motivated by the spirit of world welfare not to frighten the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.